प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे यंदाही पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे माजी सभापती वेंकय्या नायडू, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी, ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांना घोषित झाला आहे. कला, सामाजिक कार्य, विज्ञान, इंजीनियरिंग, उद्योग, वैद्यकीय, क्रीडा, शिक्षण आणि साहित्य, नागरी सेवा अशा विविध क्षेत्रातील नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली असून त्यांच्या हस्ते मार्च अथवा एप्रिलमध्ये हे पुरस्कार राष्ट्रपती भवनात प्रदान करण्यात येतील. यंदा ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण तर ११० जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापैकी ३० महिला आहेत तर ८ जण हे परदेशी, अनिवासी भारतीय आहेत तसेच त्यात मरणोत्तर ९ जणांना पुरस्कार दिला जात आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर: प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी हल्ला अयशस्वी!
मालदीवमधून लष्कर माघारी बोलावण्याचे कोणतेही आदेश नाहीत!
मनोज जरांगेच्या भगव्या वादळाला मुंबई पोलिसांचा लगाम!
पद्मभूषण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राच्या हिरमुसली कामा (साहित्य व शिक्षण), अश्विन मेहता (वैद्यकीय), राम नाईक (सार्वजनिक क्षेत्र), दत्तात्तय अंबादास मायाळू तथा राजदत्त, संगीतकार प्यारेलाल शर्मा (कला), कुंदन व्यास (साहित्य व शिक्षण) यांचा समावेश आहे. तर पद्मश्री पुरस्कारांत उदय देशपांडे (क्रीडा, मल्लखांब), मनोहर डोळे (वैद्यकीय), झहीर काझी (साहित्य व शिक्षण), चंद्रशेखर मेश्राम (वैद्यकीय), कल्पना मोरपारिया (उद्योग), शंकरबाबा पापलकर (सामाजिक कार्य) यांचा समावेश आहे. बिंदेश्वर पाठक यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात येणार असून पद्मा सुब्रमण्यम यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
पद्मविभूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, असे सगळे मान्यवर हे दक्षिण भारतातील आहेत. प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती तसेच फॉक्सकॉनचे चेअरमन यंग लिउ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून अभिनेता विजयकांत तसेच गायिका उषा उथ्थुप यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.