कुठे जय श्रीराम लिहिलेले भगवे झेंडे घेऊन काढण्यात आलेल्या मिरवणुका, कुठे रामनामाचा जप, भजने, कुठे आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या जय श्रीरामच्या घोषणा तर कुठे भंडारा, प्रसादवाटप…प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण देशात असेच मंगलमय वातावरण पाहायला मिळाले. सोमवारी ही प्राणप्रतिष्ठा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली. त्याआधीपासून हे वातावरण देशातील विविध भागात दिसून आले. सगळे भारतवासी राममय झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा यंदा ३५०वा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. त्याचवर्षी प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असल्यामुळे एक दिव्य योगायोग जुळून आल्याची भावनाही जनमानसात पाहायला मिळाली.
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्युत रोषणाईच्या माध्यमातून प्रभू श्रीराम, सीतामाई आणि बंधू लक्ष्मण यांचे चित्र साकारण्यात आले आहे. त्याचे चित्रीकरण करण्यासाठी रामभक्तांची अलोट गर्दी लोटली होती. रहदारीही त्यामुळे संथगतीने सुरू होती. पोलिसांनीही त्यावर नियंत्रण ठेवले होते. अशीच रोषणाई विविध भागात करण्यात आली होती.
हे ही वाचा:
राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला
खोदकामात मिळालेल्या ८४ खांबांनी दिला राममंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेमुळे भारत नवी उंची गाठेल
चीनमध्ये भूस्खलन होऊन ४० हून अधिक जण गाडले गेले
शहरांच्या, गावांच्या रस्त्यांवर, विजेच्या खांबांवर, इमारतींवर, घरांच्या खिडक्यांमध्ये, गॅलरीत, एवढेच नव्हे तर दुचाकी, चारचाकी वाहनांवरही भगवे झेंडे डौलाने फडकत होते. काही महागड्या गाड्याही भगव्या रंगात न्हाऊन निघाल्या होत्या. रस्त्यांच्या क़डेला श्रीराम मंदिराची प्रतिकृती तर काहीठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमांचे पूजन केले जात होते. लोकही भक्तीभावाने तिथे एकत्र येऊन दर्शन घेत होते. मंदिराच्या प्रतिकृतीची छायाचित्र घेऊन ती अभिमानाने मिरवली जात होती.
रेल्वे स्थानकांमधील स्क्रीनवरही श्रीराम मंदिराचा उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम दाखविला जात होता. अगदी रेल्वेतही असलेल्या छोट्या टीव्हीवर अयोध्येचे दर्शन होत होते.
अनेक मंडळांनी ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या, रामजपाच्या, भजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी अनेक ठिकाणी रामधून वाजत होती. रामाची गाणी घराघरात लावली गेली होती. घरातही दिवे, कंदिल लावले गेले. विविध ठिकाणी रांगोळ्या काढल्या गेल्या. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील विविध प्रसंग त्या रांगोळ्यांमधून चितारण्यात आले होते. प्रसादवाटप आणि भंडाऱ्याचे आयोजनही करण्यात आले होते. त्याचाही तमाम रामभक्तांनी लाभ घेतला.