राज्य सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्रात पाच लाख लसी वाया गेल्या. महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. महाराष्ट्रात अद्याप २३ लाख लसींचा साठा शिल्लक आहे. पुढची खेप येईपर्यंत या साठ्याचा योग्यपणे वापर करावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
रामदास आठवले यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा पडू देणार नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासन यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्याचे आठवले यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ममतांच्या भवानीपूरमध्ये अमित शहांचा झंझावात
भवानीपूरमध्ये तृणमूलच्या गुंडांचे शेवटचे प्रयत्न उघड
महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही
महाविकासआघाडी केंद्र सरकारवर लसीच्या तुटवड्यासंदर्भात करत असलेले आरोप चुकीचे आहेत. कोरोना लसीकरणावरुन राज्य सरकारने राजकारण करू नये. त्याऐवजी योग्य नियोजन करून लसीकरण सुलभ करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. महाराष्ट्राला केंद्र सरकार ने यापूर्वीच एक कोटी सहा लाख कोरोना लसीचा पुरवठा केला आहे.त्यातील पाच लाख लसी महाराष्ट्र सरकारने वाया घालविल्या त्यास जबाबदार कोण? असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला लागेल तेवढ्या कोरोना लसींचा पुरवठा केंद्र सरकार करेल. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून मी स्वतः लक्ष देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.