इराण आणि पाकिस्तानने एकमेकांवर केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पाकिस्तानने इराणमधील बलोच फुटीरतावाद्यांच्या गुप्त तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर त्यांनी पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारले आहे.
पाकिस्तानने गुरुवारी इराणमधील बलोच फुटीरतावाद्यांच्या गटाच्या तळावर केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाले. तत्पूर्वी इराणने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. पाकिस्तानच्या बलोचिस्तानमधील दहशतवादी इराणीविरोधी गटांना साह्य करत असल्याचा आरोप इराणतर्फे करण्यात आला होता. सन २०००पासून सक्रिय असलेल्या द बलोचिस्तान लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी गटाने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार, पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतावर केलेल्या हल्ल्यात काही जण मारले गेले असल्याचा दावा केला आहे.
‘पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल,’ असा इशारा या गटाने दिला आहे. ‘आता बलोच लिबरेशन आर्मी स्वस्थ बसणार नाही. आम्ही याचा बदला घेऊ आणि आम्ही पाकिस्तानविरोधात युद्ध जाहीर करत आहोत,’ असे त्यांनी यात नमूद केले आहे.मंगळवार, १६ जानेवारी रोजी इराणच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधील सुन्नी फुटीरतावादी गट जैश अल-अद्ल याच्या तळांवर क्षेपणास्त्रहल्ले केले होते. हा गट तेथून इराणच्या सुरक्षा दलावर हल्ला करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
हे ही वाचा:
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने तीन संशयितांना घेतलं ताब्यात
रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर भाजपची मोठी तयारी, देशभरात पंतप्रधानांच्या १४० सभा!
अयोध्येतील भुतो न भविष्यती सोहळा अनुभवण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी
गुजरातमध्ये नाव उलटली, १० शाळकरी मुलांसह दोन शिक्षकांचा मृत्यू!
दोन दिवसांनी पाकिस्तानच्या हवाई दलाने इराणस्थित बलोचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) आणि बलोचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांना लक्ष्य करून प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. इराणने स्वतःच्या भूमीच्या सार्वभौमत्वासाठी हे हल्ले केल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तर, पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरील हल्ल्याला बीएलए आणि बीएलएफ यांना जबाबदार ठरवून हे हल्ले केल्याचे स्पष्टीकरण दिले.
बीएलए या वांशिक फुटीरतावादी गटाने त्यांचे सदस्य हल्ल्यात मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून पाकिस्तानविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. बीएलएफ या गटाला बलुचिस्तान प्रांताला पाकिस्तानपासून स्वतंत्र करायचे आहे. तर, बीएलएचे नेतृत्व सध्या बशीर झेब बलूच नावाच्या व्यक्तीकडे आहे, जो संघटनेचा कमांडर-इन-चीफ आहे. बलुचिस्तान हा क्षेत्रफळानुसार पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असून नैसर्गिक वायू आणि खनिजांनी समृद्ध आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) च्या माध्यमातून चीनच्या बेल्ट अँड रोड उपक्रमात ते केंद्रस्थानी आहे.
बलुच दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारशी दीर्घकाळ संघर्ष केला असून वेगळ्या राज्याची मागणी केली आहे आणि इस्लामाबादवर बलुचिस्तानच्या समृद्ध संसाधनांचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. या गटांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांवर, पायाभूत सुविधांवर आणि प्रदेशातील चिनी हितसंबंधांवर हल्ले केले आहेत.बलुचिस्तानमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराने कथितपणे बेकायदा हत्या केल्याचा आरोप केला आहे. मानवाधिकार संघटनांनी याची जबाबदारी घेण्याची मागणी केली असली तरी पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावते आहेत.