मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी संकुलातील शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेच्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी कमिशनर नेमण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीच्या वादग्रस्त जागेवर सर्वेक्षण करण्यास मान्यता दिली होती.
या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या खटल्याशी संबंधित सर्व प्रकरणांच्या सुनावणीसाठी स्वत:कडे वर्ग करण्याच्या आदेशावर देखील प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने हे प्रकरण स्वतःकडे कसे वर्ग केले, असे न्यायालयाने म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय मेंटेनेबिलिटी प्रकरणावर सुनावणी करू शकते, परंतु उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कमिशनरची नियुक्ती होऊ देऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
हिंदू पक्षाच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित करत अर्ज अतिशय अस्पष्ट असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगावे लागेल. याशिवाय बदलीचे प्रकरणही या न्यायालयात प्रलंबित आहे. आम्हाला त्यावरही निर्णय घ्यायचा आहे असेही सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २३ जानेवारीला होणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्यास परवानगी दिली होती. या प्रकरणात, याचिकाकर्त्यांनी दावा केला होता की त्या मशिदीमध्ये हिंदू प्रतिके आहेत, ज्यावरून ते एकेकाळी हिंदू मंदिर होते.
हे ही वाचा:
ईडी, सीबीआय आणि एनआयएचे पथक लंडनच्या दिशेने!
मंगेशकर कुटुंबियांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
‘त्यांनी’ पत्रकार परिषद घेऊन माझा निर्णय बदलणार नाही!
अयोध्येत काँग्रेस नेत्यांच्या प्रवेशाला लोकांनी केला विरोध!
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचा वाद अनेक दशके जुना आहे. मथुरेचा हा वाद एकूण १३.३७ एकर जमिनीच्या मालकीशी संबंधित आहे. १२ ऑक्टोबर १९६८ रोजी श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानने शाही मशीद इदगाह ट्रस्टशी करार केला. या करारात या जागेवर मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, श्रीकृष्ण जन्मस्थानकडे १०.९ एकर जमिनीचा मालकी हक्क आहे तर शाही इदगाह मशिदीकडे अडीच एकर जमिनीचा मालकी हक्क आहे. हिंदू बाजूने शाही इदगाह मशिदीचे वर्णन बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली रचना आहे आणि या जमिनीवर दावाही केला आहे. शाही ईदगाह मशीद हटवून ही जमीन श्रीकृष्ण जन्मभूमीला देण्याची मागणी हिंदूंकडून होत आहे. असा दावा केला जातो की, औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केले आणि त्याच ठिकाणी १६६९- ७० मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर १७७० मध्ये गोवर्धन येथे मुघल आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधले. १९३५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने बनारसचे राजा कृष्ण दास यांना १३.३७ एकर जमीन दिली. १९५१ मध्ये श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्टने ही जमीन संपादित केली.