गिधाडांच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी वन विभागाकडून कोडरमा येथे रेस्टॉरंट बांधण्यात आले आहे.झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील तिलैया नगरपरिषदेअंतर्गत गुमो येथे हे रेस्टॉरंट बांधण्यात आले आहे.या ठिकाणी जनावरांचे शव गिधाडांना खायला देण्यात येणार आहे.
देशात हा पहिल्यांदाच अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.या रेस्टॉरंट संदर्भात गोशाळा आणि पालिकेचा प्रोटोकॉल बनवण्याची तयारी सुरु आहे.गोशाळे आणि महापालिका क्षेत्रातून जनावरांचे शव आणले जाणार आहेत.मात्र, त्यापूर्वी जनावरांचे मृतदेह हानिकारक औषधांपासून मुक्त असल्याची खात्री केली जाणार आहे.
वनविभाग अधिकारी सुरज कुमार सिंह म्हणाले की, कोडरमामध्ये गिधाडांची संख्या घटत चालली आहे.त्यामुळे व्हल्चर रेस्टॉरंटचा उपक्रम राबवत आहोत.गिधाडांना खाण्यासाठी देण्यात आलेले शव, कुत्रे आणि कोल्हे यांसारखे इतर प्राणी खाऊ नयेत म्हणून खाण्याच्या ठिकाणी बांबुचे कुंपण घालण्यात आले आहे. कोडरमामध्ये पूर्वी गिधाडे मुबलक प्रमाणात आढळत होती.मात्र, बंदी असलेल्या डायक्लोफेनॅक या औषधामुळे गिधाडांची संख्या कमी होऊ लागली आहे.
हे ही वाचा:
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही झाला डिपफेकचा शिकार!
देवरा यांच्या रूपात काँग्रेसमधील आणखी एक ‘वंशज’ गळाला
पतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे ‘कुंकू पुसले’
चायनीज मांजाने घेतला २९ वर्षीय जवानाचा जीव
डायक्लोफेनॅकच्या संपर्कात आल्यानंतर गिधाडांची किडनी निकामी होऊन त्यांचा मृत्यू होतो.त्यामुळे कोडरमामध्ये हे पक्षी जवळपास नाहीसे झाले आहेत, असे अधिकाऱ्यांने सांगितले.दोन दशकांपासून गायब झाल्यानंतर गेल्या काही वर्षात या भागात गिधाडे पुन्हा दिसू लागल्याचे त्यांनी सांगितले.वनविभागाच्या सर्वेक्षणात २०२२ मध्ये कोडरमामध्ये १३८ गिधाडयांची नोंद झाली तर २०२३मध्ये ही संख्या १४५ इतकी झाली.तर २०२४ साठी सर्वेक्षण सुरु असल्याचे सांगितले.
गिधाडांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी वन विभागाकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.गजंदि रोड गुमो येथे एक हेक्टर जागेवर हे रेस्टॉरंट सुरु करण्यात येत आहे.तसेच हे ठिकाण पक्षांसाठी खाद्य ठिकाण म्हणून लोकप्रिय आहे.यासह चांदवाडा ब्लॉकमधील करोंजीया येथे असाच आणखी एक रेस्टॉरंट बांधण्याची योजना आहे.दरम्यान, गिधाडे हे मांसाहारी पक्षी असून ते मेलेले प्राणी खाऊन पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्याचे काम करतात.त्यामुळे कॉलरा,रेबीज असा अनेक प्रकारांच्या साथींच्या रोगांपासून लोकांचे रक्षण होते.