बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे मुंबईत पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हैदराबादमध्येही लष्करामधील एका २९ वर्षीय सैनिकाचा गळा मांजाने चिरला गेल्याची घटना शनिवारी घडली. नाईक के. कोटेश्वर रेड्डी असे या जवानाचे नाव आहे. तो गोळकोंडा येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे कामानिमित्त जात होता. संध्याकाळी साडेसहा वाजता तो हैदराबाद येथील लँगर हौज उड्डाणपुलावर आला असता पथदिव्याच्या खांबाला लटकलेल्या पतंगाचा नायलॉनचा मांजा त्याच्या गळ्याभोवती लपेटून त्याचा मृत्यू झाला. या नायलॉन मांजावर आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही बंदी आहे. तरीदेखील त्याची सर्रास विक्री होत असल्याचे या घटनेवरून आढळून आले आहे.
हॉस्पिटलच्या मोटर वाहतूक विभागात तो काम करत होता. मांजाने त्याच्या गळा चिरल्यानंतर तो स्कूटरवरून खाली पडला. गंभीर जखमेनंतर त्याचा सहकारी शंकर गौडने त्याला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्याला साडेसात वाजता मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मागे पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे.
हे ही वाचा:
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केला प्लॉट!
ट्रेनमध्ये पाणी गरम करण्यासाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटमध्ये लावली इलेक्ट्रिक किटली!
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी बोधगयेतून अयोध्येत जाणार दलाई लामा
‘आम्हाला गाझामध्ये कोणीही रोखू शकत नाही’
त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. अंत्यसंस्कार विशाखापट्टणम जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी होणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्ह दाखल केला असून पोलिस तपास सुरू आहे. रेड्डी यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीत बेकायदा मांजाची विक्री करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.