पुण्यातील गुंड शरद मोहोळ हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारसह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेलच्या एका फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. पनवेल पोलीसांनी सर्व आरोपींना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची ५ जानेवारी शुक्रवार रोजी भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या हत्या प्रकरणाचा सूत्रधार आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर मानला जात होता.मात्र, या हत्याकांडाला वेगळे वळण पाहायला मिळत आहे. शरद मोहोळ हत्येच्या कटातील मुख्य आरोपी रामदास मारणे याचे नाव पुढे आले असून नवी मुंबई पोलिसांनी कारवाई करत रामदास मारणेला पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा:
‘आम्हाला गाझामध्ये कोणीही रोखू शकत नाही’
अखिलेश यादव म्हणतात अयोध्येला नंतर जाणार
मालदीवच्या राजधानी शहरातील महापौर निवडणुकीत मुईझ्झू यांच्या पक्षाचा पराभव
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी बोधगयेतून अयोध्येत जाणार दलाई लामा
पनवेल पोलीसांनी पनवेल येथील एका फार्म हाऊसवर कारवाई करत रामदास मारणेसह सहा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी तीन मुख्य आणि तीन संशयीत आरोपी आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींना पनवेल पोलिसांनी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, शरद मोहोळ हत्येप्रकरणातील अटक करण्यात आलेले आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पनवेल पोलीसांची मदत घेत पनवेल मधील एका फार्महाऊसवर छापा टाकत अटक केली.ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.