भारतीय क्रिकेट संघाला २०२४ मधील पहिली होम सीरिज अफगाणिस्तानविरुद्ध खेळायची असून दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. टी- २० वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाची ही शेवटची टी- २० मालिका असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत दुसरा इंदूरमध्ये आणि तिसरा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. मात्र, अशातच ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी- २० मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू या मालिकेचा भाग असणार नाहीत.
दुखापतीमुळे अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि फलंदाज सूर्यकुमार यादव हे या मालिकेतून बाहेर पडले आहेत. हे दोन्ही खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नसणार आहेत. मात्र, हे दोघेही आयपीएल २०२४ साठी तंदुरुस्त असतील,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वृत्तानुसार, हार्दिक पंड्याला विश्वचषक २०२३ दरम्यान दुखापत झाली होती त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेचा तो भाग असणार नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पायाला दुखापत झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. त्यामुळे तो ही सहभागी असणार नाही.
अफगाणिस्तान विरुद्धची ही मालिका २०२४ च्या टी- २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी- २० मालिका आहे. यानंतर खेळाडू आयपीएल २०२४ मध्ये व्यस्त असणार आहेत. आयपीएलनंतर लगेचच जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी- २० वर्ल्ड कप होणार आहे. या मालिकेत रोहित शर्माचे कर्णधार म्हणून पुनरागमनही होण्याची शक्यता आहे. तर खेळाडू म्हणून विराट कोहलीची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
एमटीएचएल’पाठोपाठ जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार
आंध्रप्रदेश: कोंबड्यांना धान्याऐवजी खायला दिले जाते वायग्रा आणि शिलाजीत!
पाच वर्षाच्या मुलीवर ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया
टी- २० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एकही आंतराष्ट्रीय पातळीवर टी- २० सामना खेळलेला नाही. बीसीसीआय, संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना रोहित शर्माने टी-२० विश्वचषकात संघाचा कर्णधार राहावा, अशी इच्छा आहे.