काही गोष्टी आपण या अगदी मनापासून करत असतो. त्याला नियमांचं बंधन नसतं किंवा त्या गोष्टी औपचारिकतेच्या चौकटीत बसवण्याची गरज आपल्याला वाटत नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन काही दिवसांपूर्वी असेच वागले, असं म्हणता येईल. भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे रशिया दौऱ्यावर गेले होते. तेव्हा पुतीन यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीची जगभर चर्चा झाली आणि अनेकांच्या भुवया पण उंचावल्या. कारण, पुतीन हे नेहमी त्यांच्या समकक्ष राष्ट्रप्रमुखांना भेटतात. पण त्यांनी त्यांचे प्रोटोकॉल बाजूला ठेवत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली हे नक्कीच विशेष आणि आश्चर्य व्यक्त करण्यासारखं आहे.
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी क्रेमलिन इथे पुतीन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेन युद्धासोबतच विविध मुद्द्यांवर चर्चा केली. शिवाय जयशंकर यांनी इतर काही रशियाच्या मंत्र्यांचीही भेट घेतली. व्यापार, आर्थिक मुद्दे, ऊर्जा, संरक्षण, कनेक्टिव्हिटी, सांस्कृतिक संबंध आणि दोन्ही देशांमधील सहकार्य अशा काही चर्चांवर व्यापक विचार विनिमय केला. त्यांनी बहुपक्षीय सहकार्यासोबतच जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवरही आपली मतं मांडली. काही महत्त्वाच्या करारांवर सह्यासुद्धा केल्या. पण, जगभरात चर्चा झाली ती पुतीन यांनी जयशंकर यांच्या भेटीची.
थोड्यावेळासाठी का होईना पण प्रोटोकॉल बाजूला ठेवून ते जयशंकर यांना भेटले. शिवाय त्यांनी जयशंकर यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास संदेश पण पाठवला. २०२४ मध्ये भारतात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे आणि या निवडणुकीत नरेंद्र मोदींना यश मिळावं म्हणून पुतीन यांनी त्यांना शुभेच्छा पाठवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरात लवकर भेटायला आवडेल, अशी इच्छा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली. आज जगभरात विविध पातळ्यांवर गोंधळ सुरू असताना आशियातल्या आपल्या एका सच्च्या मित्रासोबतचे संबंध मात्र अगदी उत्तम आहे आणि दिवसेंदिवस ते आणखी दृढ होत आहेत, असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला.
खरंतर, पुतीन यांचे व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्व गूढ आहे. त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल लोकांना थोडंफार माहिती आहे. धाडसी निर्णय घेणारा नेता अशी साधारण छबी लोकांसमोर आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या फार गोष्टी लोकांना माहित नाहीत. आपलं तेच खरं करणारा नेता असं साधारण त्यांचं व्यक्तिमत्त्व असावं असं वाटतं. आंतरराष्ट्रीय राजकारणातला त्यांचा दबदबा आणि रशियातली त्यांची माचोमॅनची प्रतिमा असं सगळंच विलक्षण आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून खास जयशंकर यांची भेट घ्यावी हे जरा नवलच!
अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा करिष्मा आहे, असं म्हणता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या साधारण दहा वर्षांच्या काळात भारताने विकासाची पकडलेली गती असेल, आशियातला भारताचा दबदबा असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर अगदी मजबूत होत असलेली अर्थव्यवस्था असेल यामुळे भारताची दखल आज सर्वच देशांना घ्यावीशी वाटत आहे. रशिया तरी त्याला अपवाद कसा असेल.
विकसनशील देश अशी ओळख पुसून भारताची विकसित देश अशी ओळख बनवायची असेल तर आजुबाजुच्याच देशांशी चांगले संबंध हवेत असं नाही तर, जगाच्या पाठीवर असणाऱ्या सगळ्या लहान- मोठ्या देशाशी घट्ट आणि मैत्रीचे संबंध असावेत अशी दूरदृष्टी घेऊन नरेंद्र मोदींनी सत्तेत येताच भारताचं परराष्ट्र धोरण अधिक स्वतंत्र आणि मजबूत करण्यावर भर दिला. २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेताच त्यांनी परदेश दौऱ्यांवर भर दिला. इतर देशात जाऊन तिकडच्या राष्ट्रप्रमुखांना भेटणं, त्यांना भारतात बोलावण यामुळे भारताचं परराष्ट्र धोरण अधिक भक्कम झाल्याच पाहायला मिळालं आहे. त्याचे परिणामही दिसू लागलेत.
भारत आणि रशियाची मैत्री ही काही आताची नाही. भारत आणि रशिया यांच्यात गेल्या ७० वर्षांपासून घनिष्ठ मैत्री आहे. गेल्या ७० वर्षात भारत-रशियात वाद झाल्याची एकही घटना नाही. भारत आणि रशिया संबंधात कटुता निर्माण झाल्याची एकही बातमी कधी छापून आलेली नाही. भारतानं रशियाला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. तर रशियानंही भारतानं दिलेल्या प्रत्येक हाकेला साद दिली आहे. याचे अनेक किस्से आहेत.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यांवरुन १९७१ साली भारत- विरुद्ध पाकिस्तानात युद्ध झालं. तेव्हा अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स हे सर्व देश भारताच्याविरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनात उभे होते. १९७१ च्या युद्धात तर भारताविरोधात अमेरिकेची युद्धनौका चाल करुन येत होती. मात्र, तेव्हा रशियानं भारताच्या बाजूनं पाणबुडी उतरवली. त्यामुळे अमेरिकेला माघारी फिरावं लागलं. रशियाच तेव्हा भारतासाठी धावून आला होता. त्यापूर्वी काही युरोपियन देशांनी १९६२ साली संयुक्त राष्ट्रात काश्मीरवरुन प्रस्ताव आणला होता. त्या प्रस्तावाच्या आडून भारतापासून काश्मीर तोडण्याचा डाव होता. या डावाला अमेरिका, ब्रिटन आणि चीनचीही फूस होती. मात्र अनेक युरोपियन देशांना झुगारुन तेव्हासुद्धा रशियाच भारतासाठी उभा राहिला. अगदी ठामपणे आपल्या या दोस्तासाठी रशियाने मदतीचा हात पुढे करत आपल्या शंभराव्या व्हिटोचा वापर करुन रशियानं हा प्रस्ताव धुडकावून लावला.
रशियन डिफेन्स इंडस्ट्रीचा भारत सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. भारत एकूण शस्रांपैकी ७० टक्के शस्त्र फक्त रशियाकडूनच खरेदी करतो. विशेष म्हणजे रशिया फक्त शस्रचं देत नाही, तर त्या शस्त्रांबरोबरच त्याची टेक्नॉलॉजीसुद्धा देतो. जगात अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देशसुद्धा मोठे शस्रं उत्पादक देश आहेत. मात्र, ते टेक्नॉलॉजी कधीच देत नाहीत. पण रशियाने भारताला शस्रांबरोबरच त्याची टेक्नॉलॉजीसुद्धा दिली. रशियासोबत शस्र खरेदीचा करार करु नका, म्हणून अमेरिकेनं अनेक देशांना धमक्या दिल्या होत्या. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारतानं रशियासोबत S-400 अँटी बॅलेस्टिकचा मिसाईल खरेदीचा करार केला. भारतानं अमेरिकेला न भीता भारत-रशिया संबंधात कधीच कटुता येऊ दिली नाही.
भारताचे अमेरिकेशी संबंधही आता जुळू लागलेत. पण, अमेरिका हा एक संधिसाधू देश आहे असं म्हटलं जातं. रशिया- युक्रेन युद्धाच्या वेळी रशियाला थोपवण्यासाठी म्हणून अमेरिकेने युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरणार असल्याचं वारंवार सांगितलं, पण, युक्रेनला गरज असताना अमेरिकेने कच खाल्ली आणि आजही युक्रेन एकाकी लढतोय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका फोननंतर पुतीन यांनी सहा तास युद्ध थांबवलं होतं. यामुळे युक्रेनमध्ये अडकेल्या हजारो भारतीयांना मायदेशात परतता आलं.
वास्तविक अमेरिकेला भारताची गरज आहे. चीनला रोखायच असेल तर अमेरिकेला भारताची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेचं विविध आघाड्यांवर अमेरिका भारताला घेऊन नवनवे गट तयार करतो आहे. जेणेकरून चीनच्या कुरापतीना आळा घालता येईल. रशिया आणि चीनचे संबंध चांगले असल्यामुळे अशा गटात भारतानेही अमेरिकेला धरून ठेवले आहे. पण, म्हणून अमेरिका म्हणेल ते भारताचे धोरण ठरत नाही. या नव्या भारताचं स्वतःचं मत आहे आणि स्वतंत्र धोरणही आहे. जे जनतेच्या हिताचं असेल.
रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशियाकडून येणाऱ्या कच्च्या तेलासाठी आतंरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे बंद झाले होते. पाश्चिमात्य देशांनी रशियासाठी दारं बंद केली होती. रशियाला एकाकी पाडण्यासाठी ही धडपड सुरू होती. तेव्हा निडरपणे भारताने आपली दारं खुली केली. स्वस्तात तेल मिळालं. पण त्यात होतं ते निव्वळ जनहित. कोणाच्याही दबावाला बळी न पडता भारताने कच्चं तेलं खरेदी केलं आणि दुसरीकडे रशियाला युद्ध न करण्याचा सल्लाही दिला. शांततेत चर्चा करून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं. त्यामुळे अलीकडे भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध वाढले असले तरी मात्र अमेरिकेच्या नादी लागून भारतानं कधीच रशियाला दूर केलं नाही. रशियानंसुद्धा आशिया खंडात भारताला कधीच एकटं पडू दिलेलं नाही.
हे ही वाचा:
जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल म्हणतात, आता तुरुंगातच मेलो तर बरे’!
मालदीवच्या नेत्याने केलेल्या भारताच्या अपमानानंतर बायकॉट मालदीव ट्रेंडमध्ये
बांगलादेशच्या हसीना म्हणतात, भारत हा विश्वासू मित्र!
अयोध्येत जमिनींना चढला भाव; किंमती चारपट वाढल्या
पुतीन यांनी भारताच्या मेक इन इंडिया या धोरणाचंही कौतुक केलं होतं. पाश्चिमात्य देश रशियासोबत व्यापारावर सातत्याने बंदी घालतात, तेव्हा आपण भारतासारख्या आपल्या देशातील कंपन्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे, असं ते म्हणाले होते. अंतराळ मोहिमांमध्ये तर भारत-रशियाचे संबंध अत्यंत जुने आहेत. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा रशियातूनच लाँच झाला. कारण, त्या काळात भारताकडे लाँचिंग पॅड नव्हते. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. ती गोष्ट सुद्धा रशियाच्या मदतीनंच शक्य झाली.
आशिया खंडात भारत एकटा पडावा, यासाठी चीन आणि पाकिस्ताननं अनेकदा प्रयत्न करुन पाहिले. रशियाला भारतापासून दूर करण्याचे डावसुद्धा रचले गेले. मात्र, भारत-रशिया संबंधांवर त्यात काडीचाही फरक पडला नाही. पुढेही पडणार नाहीत हे पुतीन आणि एस जयशंकर यांच्या भेटीने अधिक अधोरेखित केलं आहे.