अमेरिकी लष्कराने गुरुवारी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला केला. ज्यात इराणसमर्थक एका मोठ्या दहशतवादी संघटनेच्या नेत्याचा मृत्यू झाला. इराकमध्ये नुकत्याच अमेरिकेच्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्यांना हा नेता जबाबदार होता, अशी माहिती वॉशिंग्टनमध्ये अमेरिकी संरक्षण मंत्रालय पेंटागॉनतर्फे देण्यात आली.
अमेरिकी लष्कराने हवाई हल्ल्यात मुश्ताक जवाद काजिम अल जवारी याला लक्ष्य केले. जवारी हा हरकत अल जुबाना संघटनेचा नेता होता. जो अमेरिकी सैन्यांविरोधातील हल्ल्यांचा कट रचण्यात आणि तो तडीस नेण्यात सहभागी होता. पेंटागॉनचे प्रवक्ते मेजर जनरल पॅट्रिक रायडर यांनी हा हल्ला आत्मसंरक्षणासाठी केला गेल्याचे सांगितले. यात हरकत अल नुजाबाचा आणखी एक सदस्यही मारला गेला आहे. या हल्ल्यात कोणीही सर्वसामान्य नागरिक मारला गेला नाही, तसेच कोणत्याही पायाभूत सुविधांचे नुकसान झालेले नाही, असा दावाही पेंटागॉनने केला आहे.
हे ही वाचा:
हिजबुलचा वॉन्टेड दहशतवादी जाविद अहमद मट्टू दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!
राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!
२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!
ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून इराक आणि सिरियामध्ये अमेरिकी लष्करावर रॉकेट आणि ड्रोनच्या माध्यमातून सुमारे १०० वेळा हल्ले झाले आहेत. इराकमध्ये अमेरिकेचे अडीच हजार सैनिक आणि शेजारच्या सिरियामध्ये ९०० सैनिक आहेत. इराक आणि सिरियामधील इराणसमर्थक मिलिशिया समूह गाझामधील इस्रायलच्या कारवाईच्या विरोधात आहेत. तसेच, ते गाझा युद्धासाठी अमेरिकेला जबाबदार मानतात. अमेरिकेच्या ड्रोनने नुजाबा मिलिशिया समूहाच्या बगदादमधील मुख्यालयावर किमान दोन क्षेपणास्त्रे डागली. हे क्षेपणास्त्र एका गाडीला धडकले. ज्यामध्ये एक मिलिशिया कमांडर आणि त्यांच्या सहकाऱ्यासह चार व्यक्तींचा मृत्यू झाला.
इराकच्या पंतप्रधानांची टीका
इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांच्या लष्करी प्रवक्त्याने अमेरिकेच्या या हल्ल्यावर टीका केली आहे. हा हल्ला इराकच्या सुरक्षा तंत्रावर असल्याचा दावा केला आहे. इराकच्या पंतप्रधानांना इराणसमर्थित मिलिशिया गटाचे समर्थन आहे.
इराकी दहशतवादी संघटनेचा बदला घेण्याचा इशारा
‘आम्ही या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ आणि तेव्हा अमेरिकेला पश्चाताप करण्याची वेळ येईल,’ असा इशारा स्थानिक इराकी मिलिशिया कमांडर अबू अकील अल-मौसावी याने दिला आहे.