अयोध्येत भव्य असा श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाचे लोकार्पण केले. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा संपल्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश एटीएस प्रमुख अमिताभ यश यांनाही ठार मारण्यात येणार आहे असा धमकीचा ईमेल प्राप्त झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
अयोध्येतील राम मंदिर, योगी आदित्यनाथ आणि अमिताभ यश यांना बॉम्बने उडवून टाकू अशी धमकी देणारा मेल आला आहे. भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा मेल प्राप्त झाला आहे. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. धमकी देणारा स्वतःला आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा करत आहे.
भारतीय किसान मंच आणि राष्ट्रीय गौ परिषदेचे कार्यकर्ते असलेल्या देवेंद्र तिवारी यांना धमकीचा मेल आला. या मेलमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला असून ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव जुबेर हुसैन खान असल्याचे म्हटले आहे. आपण आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा त्याने केला आहे. यासंदर्भात देवेंद्र तिवारी यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश आणि मला जुबेर खान नावाच्या व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली आहे.
हे ही वाचा:
राहुल गांधींना मोठा नेता मानण्याची गरज नाही!
म्हैसूर: ड्रेनेजच्या खोदकामात ११ व्या शतकातील तीन जैन शिल्पे सापडली!
सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे
सरत्या वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी घेतला देशाच्या यशाच्या आलेखाचा आढावा
“आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर आपल्या सुरक्षेबाबत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे गौसेवेच्या नावावर आपण शहीद होऊ शकतो. दरम्यान या प्रकरणाचा तपास लखनऊ एटीएसकडून सुरु करण्यात आला आहे,” अशी माहिती देवेंद्र तिवारी यांनी दिली आहे.