भारताची अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ ही सध्या आगामी मोहिमांच्या कामांमध्ये गुंतली आहे. आगामी काळात इस्रोच्या अनेक महत्त्वाकांक्षी मोहिमा पार पडणार आहेत. नुकतीच इस्रोने ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी ‘एक्सपोसॅट मिशन’ लाँच करणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं की, येत्या पाच वर्षांमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी म्हणून इस्रो तब्बल ५० उपग्रह अवकाशात सोडणार आहे.
भारताच्या या ५० उपग्रहांमुळे देशाच्या सीमा क्षेत्रासह चीन- पाकिस्तान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर अधिक बारकाईने लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. हजारो किलोमीटर क्षेत्राचे एचडी फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहांमध्ये असणार आहे. अवकाशातील विविध कक्षांमध्ये हे उपग्रह तैनात करण्यात येतील, असंही सोमनाथ यांनी स्पष्ट केलं आहे.
आयआयटी मुंबईचा वार्षिक विज्ञान आणि औद्योगिक सोहळा, म्हणजेच ‘टेक फेस्ट’ला सोमनाथ यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी इस्रोच्या या मोहिमेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “भारताला एक मजबूत राष्ट्र बनवायचं असेल तर त्यासाठी सध्या उपलब्ध सॅटेलाईट्सचा ताफा पुरेसा नाही. आजच्या तुलनेत आपल्याकडे दहा पट मोठ्या आकाराच्या ताफ्याची गरज आहे. येत्या पाच वर्षांमध्ये ५० उपग्रहांना पूर्ण करण्याची आमची योजना आहे. यासाठी उपग्रह असेंबल करण्यात आले आहेत. जे येत्या काही वर्षांमध्ये भारतात येतील आणि प्रक्षेपित केले जातील. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारत संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी तत्पर असणार आहे,” असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
राष्ट्रीय खेळांमध्ये डोपिंगमध्ये अडकले २५ खेळाडू
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जायचे की नाही?
कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा, शिक्षेला स्थगिती!
करणी सेना प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोजर!
इस्रोने आपल्या अभूतपूर्व कामगिरीच्या जोरावर २०२३ साली चांद्रयान- ३, आदित्य एल- १ यांसह अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडून दाखवल्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो एक्सपोसॅट मोहीम लाँच करणार आहे. तसेच, ६ किंवा ७ जानेवारी रोजी आदित्य यान देखील एल- १ पॉइंटवर पोहोचणार आहे. याठिकाणी प्रस्थापित झाल्यानंतर ते सूर्याचा अभ्यास सुरू करेल.