देशभरात थंडीची गुलाबी लाट पसरत असताना काही राज्यांमध्ये दाट धुके पसरण्यासही सुरुवात झाली आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीत आणि दाट धुक्यात हरवले आहे. दाट धुक्यामुळे अनेक भागात दृश्यमानता शून्यावर पोहोचली. गुरुवार, २८ डिसेंबर रोजी दिल्ली, एनसीआर, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब ते राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये दाट धुके पसरले आहे. याचा परिणाम जनजीवनावरही होऊ लागला आहे.
धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक विमान उड्डाणे वळवण्यात आली आहेत तर अनेक रेल्वे गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे. उत्तर प्रदेशात कडाक्याच्या थंडीमुळे आग्रा भागात गुरुवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, गाझियाबादमध्येही शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. गाझियाबादच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहेत.
तर, धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे बुधवारीही अनेक रस्ते अपघात झाले. बुधवारी दाट धुक्यामुळे उड्डाणे आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. भारतीय हवामान विभागाने दिल्लीत गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री, सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता वर्तविली आहे. गुरुवारी कमाल तापमान २१ आणि किमान तापमान ६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
बुधवारी अनेक रेल्वे गाड्या सुमारे आठ तास उशिराने धावल्या. अनेक प्रवाशांनी आपली नाराजीही व्यक्त केली. विमानांचीही तीच अवस्था होती. अनेक उड्डाणांना उशीर झाला तर काही जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आले.
हवामान खात्याने उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा इशाराही जारी केला आहे. वायव्य भारतात पुढील तीन- चार दिवस दाट धुके राहण्याची शक्यता आहे, तर वायव्य आणि मध्य भारतात ३१ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत कमी धुके राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज
येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत
वर्ल्ड कप फायनलमध्ये जमा झालेल्या प्लास्टिक कचऱ्यातून बेंच, जॅकेट
रिझर्व्ह बँक धमकी प्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या
दुसरीकडे, पंजाब आणि हरियाणामध्ये तापमानात सातत्याने घट होत असल्याने दोन्ही राज्यांच्या अनेक भागात दाट धुके कायम आहे. तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस कडाक्याच्या थंडीचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम दिल्ली-एनसीआरवर दिसू शकतो.