निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे एक कथित पत्र मीडिया आणि सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शंभर कोटी वसूल करायला सांगितल्याचा गौप्यस्फोट वाझे याने केला आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ आता अनिल परब यांच्यावरही शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप लागले आहेत. सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव या पत्रात घेण्यात आले आहे. एनआयए कडून न्यायालयात हे पत्र सादर केले जाणार आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणात प्रमुख आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याची सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. बुधवारी वाझे याचे एक कथित पत्र समोर आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाला उद्देशून वाझे याने हा पत्ररूपी जबाब दिला आहे. या पत्रात वाझे यांनी असे आरोप केल्येत की अनिल परब यांनी मुंबई महापालिकेच्या अंदाजे ५० भ्रष्ट काँट्रॅक्टर्स कडून प्रत्येकी २ कोटी वसूल करण्यास सांगितले तर ‘एसबीयुटी’ या संस्थेच्या विश्वस्तांकडून ५० कोटी आणण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
नक्षली हल्ल्यातूनही विरोधकांचा ‘फेक न्यूज’चा प्रयत्न
अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्य्स्फोट
अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव
अजित पवारांवरही सचिन वाझेकडून आरोपांच्या फैरी
काय आहे वाझेचा दावा?
“जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये मला मा.मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलवले. त्याच आठवड्यात मुंबईतील उपायुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये ३-४ दिवसात फेरबदल होणार होते. परब यांनी मला ‘एसबीयुटी’च्या (सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट) तक्रारीत लक्ष घालण्यास सांगितले ज्यात प्राथमिक चौकशी सुरू होती. त्यांनी मला या संस्थेच्या विश्वस्तांना चौकशी संदर्भातील वाटाघाटींसाठी भेटायला घेऊन येण्यास सांगितले. तसेच ही चौकशी बंद करण्यासाठी संस्थेकडे ५० कोटी रूपयांची मागणी करण्यासाठीची प्राथमिक चर्चा करण्यासाठीही सांगितले. यावेळी मी एसबीयुटीच्या लोकांना ओळखत नसल्याने, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करण्यास अपात्र असल्याचे सांगितले.
जानेवारी २०२१ मध्ये परब यांनी पुन्हा एकदा मला त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावले. यावेळी त्यांनी मला मुंबई महापालिकेतील भ्रष्ट काँट्रॅक्टर्स विरोधातील चौकशीत लक्ष घालण्यास सांगितले. त्यांनी मला या अंदाजे ५० काँट्रॅक्टर्स कडून प्रत्येकी २ कोटी रूपये आणण्यास सांगितले.”
असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्या नंतर परब यांच्यावरही १०० कोटींचे आरोप लागले आहेत. त्यामुळे आता परब यांच्यावरील आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काय नवे वळण येते याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.