सायन चुनाभट्टी गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांना हत्यार आणि मोटारसायकल पुरवणाऱ्या नवीमुंबईतील एका ज्वेलर्ससह दोघांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या दोघाना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ५ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सानिध्य देसाई आणि प्रभाकर पंचिब्रे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यात आरोपीची संख्या ६ झाली आहे. सानिध्य देसाई हा नवीमुंबई येथील ज्वेलर्स असून कळंबोली येथे त्याचे ज्वेलरी चे दुकान आहे. सायन चुनाभट्टी येथील आझाद गल्ली या ठिकाणी असलेल्या श्री फोटो स्टुडिओ या ठिकाणी रविवारी दुपारी चार हल्लेखोरांनी स्थानिक गुंड सुमित येरूणकर याच्यावर बेछूट गोळीबार केला होता.
या गोळीबारात सुमित येरूणकर हा जागीच ठार झाला होता, तसेच त्याचे चार सहकारी आणि आझाद गल्ली येथे राहणारी आठ वर्षाची मुलगी त्रिशा शर्मा ही जखमी झाली होती. या गोळीबार प्रकरणात चुनाभट्टी पोलिसानी आठ तासात ४ हल्लेखोरांना अटक केली होती. सनील उर्फ सन्नी पाटील, सागर सावंत, नरेश उर्फ नऱ्या पाटील आणि आशुतोष गावण असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे होती. हा हल्ला बांधकाम विकासक यांच्याकडून मिळणाऱ्या कामाच्या कंत्राटे तसेच वर्चस्वाच्या लढाईतून करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
हे ही वाचा:
चौदावा केशवसृष्टी पुरस्कार डॉ. बालाजी आसेगावकर यांना प्रदान
राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण नाकारणाऱ्या येचुरींना विहिंपचा सल्ला
केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!
भारत जोडून झाल्यावर राहुल गांधींची आता न्याय यात्रा
या हल्ल्यासाठी देशी बनावटीचे पिस्तुल वापरण्यात आले होते, हे पिस्तुल आणि पळून जाण्यासाठी मोटारसायकल पुरवणाऱ्या नवी मुंबईतील ज्वेलर्स सानिध्य देसाई आणि घटनास्थळाची रेकी करून सुमितची खबर देणारा प्रभाकर पंचिब्रे या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना ५ जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.