पंजाबवासीयांचे पाश्चिमात्य देशांत जाण्याचे वेड कमी होताना दिसत नाही. त्यासाठी अवैध मार्गांचा वापर करण्यात ते मागेपुढे पाहत नाहीत आणि त्यापायी पैसाही गमावून बसतात. बहुतेक भारतीय नागरिकांसह २७६ प्रवाशांनी भरलेले विमान मानवी तस्करीच्या उद्देशाने फ्रान्समध्ये रोखण्यात आले होते. हे विमान दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दाखल झाले असताना आता नवी घटना समोर आली आहे.
पाश्चात्य देशांत जाण्याच्या प्रयत्नात नऊ दिवस जंगलात काढल्यानंतर, विविध देशांच्या सीमा सुरक्षा दलाने दोनदा हाकलून लावल्यानंतर आणि रशियाच्या तुरुंगात दिवस काढल्यानंतर अखेर सहा तरुण रशियातून भारतात परतले आहेत. या सहापैकी पाच पंजाबचे तर एक तरुण हरयाणाचा आहे. या तरुणांच्या नातेवाइकांनी राज्यसभेचे खासदार बाबा बलबिर सिंग सीचेवाल यांच्याकडे धाव घेतली होती. सीचेवाल यांच्या पाठपुराव्यामुळे हे तरुण मायदेशी परतू शकले आहेत.
जालंधर जिल्ह्यातील मेहमुलाव मेहलान गावातील दलित ख्रिश्चन असलेला लखबिर सिंग म्हणतो, ‘आम्ही तिघे जण १२ ऑक्टोबर रोजी ओमानला गेलो. १३ दिवसांनी मॉस्कोला गेलो. तिथे आम्ही पाच ते सहा दिवस राहिलो. तिथे आमच्यात आणखी एक तरुण सामील झाला. त्यानंतर टॅक्सीने आम्हाला बेलारूसला नेण्यात आले. तिथे दोन खोल्यांमध्ये २२ जणांना ठेवण्यात आले होते. त्यात काही पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानीदेखील होते. तर, पंजाब, हरयाणा आणि गुजरातमधील आम्ही काही भारतीयही होतो.’ ‘बेलारूसहून आम्हाला जंगलमध्ये नेण्यात आले आणि आम्हाला लॅटव्हिया येथे नेले जाईल असे सांगण्यात आले होते. यावेळी आमच्यासोबत तीन स्थानिक तस्करही होते.
आम्ही सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सीमा सुरक्षा दलाने आमचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि आम्हाला पुन्हा दाट जंगलात धाडले. त्यानंतर आम्हाला लिथुआनियाच्या दिशेने नेण्यात आले. मात्र तोही प्रयत्न फसला. पोलंडला जाण्याचा प्रयत्नही फसला. आम्ही पुन्हा पकडले गेलो. तोपर्यंत आमची परिस्थिती बिकट झाली होती. आमच्याकडचे सर्व खाद्यपदार्थ संपले होते. आम्ही झाडांची पाने खाऊन जगत होतो. पंजाबमधील १८ वर्षीय तरुण आणि ३५ वर्षीय व्यक्ती चालू न शकल्याने मागेच राहिले. बेलारूसला परतल्यानंतर आम्हाला खोल्यांमध्ये ठेवण्यात आले. तेव्हा स्थानिक तस्करांनी आम्हाला त्या दोघांनी जंगलातच प्राण सोडल्याचे सांगितले,’ लखबीर सर्व आपबिती सांगत होता.
त्यांना रशियाला पुन्हा नेण्यात आले आणि त्यानंतर दोनदा १४०० किमीचा प्रवास त्यांना प्रवासी बसमधून करायला लावला. या बसमधून ते फिनलंडला पोहोचतील आणि तेथून त्यांना फ्रान्स किंवा इटलीला नेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.
‘दोन्हीवेळा रशियन दलाने आम्हाला अडवले. दुसऱ्यावेळी जेव्हा त्यांना अडवले तेव्हा सहाही जणांच्या व्हिसाची मुदत संपल्याचे आढळले. त्यामुळे आम्हाला तुरुंगात डांबण्यात आले.
आमच्या कुटुंबाने त्यानंतर बाबा सीचेवाल यांच्याशी संपर्क साधला. मॉस्कोतील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी आमची सुटका झाली आणि आम्ही २४ डिसेंबरला दिल्लीत पोहोचलो. आम्हाला इतरांचे काय झाले, काहीच कळलेले नाही,’ असे त्याने सांगितले.
हे ही वाचा:
सीएएची अंमलबजावणी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही!
शेख हसिनांकडून मुस्लिमांचे लांगुलचालन!
केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!
बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद
फझिल्का जिल्ह्यातील सोना संधार गावचा २१ वर्षीय बलिवंदर सिंग याला स्पेनला जायचे होते. त्यासाठी त्याने १३ लाख रुपये एजंटला दिले होते. शिवाय दोन लाख रुपये रोख स्वतःजवळ ठेवले होते. या सर्वांच्या कुटुंबीयांनी मुलांना परदेशी पाठवण्यासाठी कर्ज काढले होते. आता हे कर्ज कसे फेडायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.