काँग्रेसने नुकतेच पक्षामध्ये मोठे फेरबदल करून प्रियंका गांधी वड्रा यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. त्यांच्या जागी पक्षाने राज्यसभेचे माजी खासदार अविनाश पांडे यांना संधी दिली आहे. मात्र प्रियंका गांधी यांना हटवले जाण्याबाबत खुद्द काँग्रेस पक्षातील नेत्यांना धक्का बसलेला नाही. सन २०२२मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर प्रियंका येथे फिरकल्याच नसल्याचे समजते.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने याबाबत अधिक माहिती दिली. ‘सन २०२२च्या पराभवानंतर प्रियंका यांनी उत्तर प्रदेश सोडले होते आणि त्या कधी परतल्याच नाहीत. यात धक्कादायक काहीही नाही. आम्ही पांडे यांना काम करताना बघितले आहे. आम्हाला आता त्यांच्यासारख्या नेत्यांची आवश्यकता आहे. आम्ही मोठे नेते गमावले असल्याने पक्षाने उत्तर प्रदेशात पाठिंबा गमावला आहे. जे थांबले आहेत, त्यांनी स्वतःला दररोजच्या कामांतून विलग केले आहे. पांडे यांच्या आगमनामुळे पक्षकार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल,’ असा विश्वास या नेत्याने व्यक्त केला आहे. सन २०२०मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्यानंतर प्रियंका यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
हे ही वाचा:
अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली
बारामतीतील प्रकल्पासाठी २५ कोटी देणाऱ्या अदानींचे पवारांकडून कौतुक
कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण!
भाषण देत असतानाच आयआयटी कानपूरचा प्राध्यापक कोसळला
टीम राहुलचा उत्तर प्रदेशात प्रवेश?
पांडे हे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे उत्तर प्रदेशात प्रियंका यांना बाजूला सारून आता राहुल गांधी यांच्या टीमने राज्याची धुरात हाती घेतली आहे, असे मानले जात आहे. मात्र याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. तसेच, ब्राह्मण असलेल्या पांडे यांची नियुक्ती म्हणजे सोशल इंजिनीअरिंगचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीत समाजवादी पक्षासोबत जागावाटपाची चर्चाही होणार आहे. ही अवघड चर्चा यशस्वीपणे पूर्ण करण्याचे शिवधनुष्यही या नेत्याला उचलावे लागणार आहे.