आयआयटी कानपूरमध्ये माजी विद्यार्थी संमेलनात भाषण देत असतानाच ५५ वर्षीय ज्येष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
खांडेकर हे विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी घेण्याचे वेगवेगळे मार्ग सांगत होते, त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. ‘तुमच्या आरोग्याची काळजी घ्या’ हे त्यांचे शेवटचे शब्द होते. हे शब्द उच्चारल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांच्या छातीत दुखू लागले. ते काही वेळ बसलेही, मात्र ते भावूक झाले असतील, असा श्रोत्यांचा समज झाला. त्यानंतर प्राध्यापकांच्या चेहऱ्यावर घाम फुटला आणि ते स्टेजवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे डॉ. नीरज कुमार यांनी सांगितले.
‘त्यांची वैद्यकीय पार्श्वभूमी पाहून आणि तपास करून, इतकेच सांगता येईल की त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला किंवा हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला होता. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समजेल,’ असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. केंब्रिज विद्यापीठात शिकणाऱ्या त्यांच्या मुलाकडून वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, असे खांडेकर यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
हे ही वाचा:
राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत
काँग्रेस नेते सुनील केदारांची आमदारकी रद्द, पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा!
‘खासदारांचा जाणुनबुजून गोंधळ’; निलंबनाबाबत राज्यसभाध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करणार!
‘बृजभूषण यांचा निकटवर्तीय असलो तरी मी डमी उमेदवार नाही’
खांडेकर यांना सन २०१९पासूनच कोलेस्टेरॉलचा त्रास होता आणि त्याच्यावर त्यांचे वैद्यकीय उपचारही सुरू होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि मुलगा आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये जन्मलेले खांडेकर यांनी आयआयटी कानपूर येथून बीटेकची पदवी प्राप्त केली होती. तसेच, त्यांनी जर्मनीत पीएचडी मिळवली होती.
सन २००४मध्ये ते आयआयटी कानपूरमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक झाले. त्यानंतर त्यांची मेकॅनिकल विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विद्यार्थी कल्याण विभागाचे डीन म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या नावावर आठ पेटंट आहेत.