मद्यपरवाना घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. याआधी ईडीने २ नोव्हेंबर रोजी केजरीवाल यांना समन्स बजावले होते. तर, आम आदमी पक्षाने हा कट असल्याचे संबोधले आहे.
ईडीने केजरीवाल यांना २१ डिसेंबर रोजी सादर होण्यास सांगितले आहे.
याआधी ईडीने केजरीवाल यांना २ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावले होते. परंतु केजरीवाल यांनी या नोटिशीला बेकायदा संबोधून ती मागे घेण्याची मागणी केली होती. ईडीने मुख्यमंत्र्यांना अशा वेळीच समन्स बजावले आहे, ज्या कालावधीत ते विपश्यनेसाठी जाणार आहेत. केजरीवाल हे १९ डिसेंबरला १० दिवसांसाठी विपश्यनेसाठी जाणार आहेत. ते १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विपश्यनेसाठी जाणार आहेत.
अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह याआधीच तुरुंगात आहेत. ईडीने अन्य आरोपींची चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीला मुख्यमंत्र्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत.
हे ही वाचा:
खर्गे म्हणतात, ‘ एक महिन्याचे वेतन काँग्रेसला दान केले’
चीनमधील भूकंपात १११ ठार; २३० जखमी!
तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले
‘ईडीची नवी नोटीस म्हणजे कट’
ईडीने पाठवलेली नवी नोटीस म्हणजे कट असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. ‘हे प्रकरण पूर्णपणे बोगस आहे. मुख्यमंत्र्यांचा आवाज दाबण्याचा आणि आम आदमी पक्षाला संपवण्याचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री हे ठरलेल्या कार्यक्रमानुसार, विपश्यनेला जातील. या देशात जो कोणी केंद्र सरकारला प्रश्न विचारतो, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो,’ असा आरोप आपचे राज्यसभेचे खासदार डॉ. संदीप पाठक यांनी केला आहे.