उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शनिवारी मोर्चा काढला होता मात्र या मोर्चात ठाकरे गटापेक्षा इतरांचीच गर्दी अधिक दिसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत होते.
उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात ठाकरे गटाने एल्गार पुकारला होता. त्यासाठी त्यांनी धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला. स्वतः उद्धव ठाकरे व युवा नेते आमदार आदित्य ठाकरेही त्यात सहभागी झाले. मात्र हा मोर्चा ठाकरे गटाचा आहे असे म्हणता म्हणता त्यात इतर पक्षांचीच भाऊ गर्दी अधिक दिसली.
जवळपास १४ ते १५ पक्ष, संघटना, युनियन्स यांचा समावेश या मोर्चात होता. एकंदरीत महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणूनच याकडे पाहिले गेले. पण त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले. दुपारी ३ वाजता मोर्चा सुरू झाल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले आणि मग उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अदानींवर टीका केली.
या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी चालायला सुरुवात केली तेव्हा भगव्या झेंड्यांऐवजी तिथे कम्युनिस्ट पार्टी, आरपीआयचे झेंडेच अधिक दिसत होते. विविध कामगार युनियन्सचे बॅनरही त्यात दिसत होते. त्यामुळे हा मोर्चा ठाकरे गटाचा आहे का, अशी शंका उपस्थित होऊ लागली.
ठाकरे यांनी त्यानंतर झालेल्या भाषणात अदांनीवर टीका केली पण नेहमीप्रमाणे टोमण्यांची आतषबाजीही केली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू दिली जाणार नाही, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहेत, गुजरातमध्ये वर्ल्डकप फायनलही पळविली अशा मुद्द्यांवर ठाकरे बोलले.
हे ही वाचा:
३० डिसेंबर रोजी श्रीराम विमानतळ अन् अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन
संसद हल्लाप्रकरणी महेश कुमावतला दिल्ली पोलिसांकडून अटक
अभिनेता अल्लू अर्जुनने दारू, पान मसाला ब्रँडची जाहिरात नाकारली
यासंदर्भात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार म्हणाले की, अदानींकडून ठाकरेंना पैसे मिळाले की, ते आपल्या भूमिकेपासून यूटर्न घेतील. भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी ठाकरेंवर कडवट टीका केली. त्यांनी ट्विट करत म्हटले की, आता धारावीच्या नावाने अदानीकडून पैसे वसूल करण्याची तयारी सुरू आहे. १० अब्ज रुपयांची वसुली करायची आहे. उद्धव यांना दुबईच हॉटेल खरेदी करायचे आहे. ज्याचे डील छोट्या ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योगसमुहाला मिळाला आहे. त्यांनी यासाठी ५०६९ कोटींची बोली लावली आहे. ५० अब्ज ६९ कोटी इतकी ही बोली आहे. त्यातच १० अब्ज आपल्याला मिळावेत अशी उद्धव यांची अपेक्षा आहे, असे कंबोज यांनी म्हटले आहे.