मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली जाईल, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे. ‘हे दोघेही आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही एका सामान्य कार्यकर्त्याचाही उपयोग करून घेतो. हे तर आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार काम दिले जाईल आणि तेही चांगले काम दिले जाईल,’ असे नड्डा यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते.
जेव्हा शिवराजसिंह, वसुंधरा राजे आणि रमण सिंह यांच्याशी चर्चा करता, तेव्हा त्यांच्याकडून बंडखोरी वृत्तीचे दर्शन घडते का, अशी विचारणा केली असता, ‘मानवी दृष्टिकोन समजून व्यवहार करणे भाजप कार्यकर्त्याला येते. अडचणी तेव्हाच येतात, जेव्हा तुमचा मनोदय वेगळाच असतो, अजेंडा वेगळाच असतो आणि तुम्ही बोलत वेगळेच असता. मात्र आमच्या बाबत असे काहीच नाही,’असे नड्डा यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
आसाममधील एक हजार २८१ मदरसे कायमचे बंद!
मराठा आरक्षणासाठी तरुणाची विष घेऊन आत्महत्या
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन होणार
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णय
‘पक्षाला आज यश मिळालेले नाही. तर, हे अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे फळ आहे. काँग्रेसकडे कोणाकडेही नैतिक अधिकार नाही. सगळेजण खुर्चीला चिकटले आहेत. मात्र आमच्याकडे असे नाही. पंतप्रधान मोदी जेव्हा संघटनेत होते, तेव्हा त्यांना उत्तरेचे काम दिले आणि ते उत्तरेला गेले. त्यांना दक्षिणेचे काम सोपवले, तेव्हा त्यांनी तिथे जाऊन काम केले. जेव्हा त्यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली तेव्हा त्यांनी तीही सांभाळली. असे अनेकजण आहेत, ज्यांनी राजीनामा देऊन पक्षाचे काम सांभाळले,’ याची आठवण त्यांनी करून दिली. आमच्याकडची माणसे राष्ट्रहित प्रथम, पक्ष दुसरे आणि सर्वांत शेवटी स्वतः या सिद्धांताचे पालन करतात, असेही ते म्हणाले.