संसदेवर झालेल्या २००१ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सुरक्षा जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी श्रद्धांजली वाहिली.त्यांच्यासोबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर नेत्यांनी संसदेत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि एक मिनिट मौन पाळले.तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या संसदीय अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार अधीर रंजन चौधरी आणि इतर नेतेही यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हणाले की, “आज आम्ही २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सुरक्षा कर्मचार्यांचे स्मरण करतो आणि त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे धैर्य आणि त्यांनी दहशतवाद्यांशी सामना करताना देशासाठी दिलेले बलिदान देशाच्या स्मरणात कायमचे कोरले जाईल.”
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली. २००१ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूर सुरक्षा जवानांचे देश सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन त्यांनी केले.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत लिहिले की, आजच्या दिवशी २२ वर्षांपूर्वी देशाच्या राजकीय नेतृत्वाची सर्वोच्च फळी ( संसद भवन) संपवण्याचा आणि लोकशाही मंदिराचे नुकसान करण्याच्या हेतूने आलेल्या दहशतवाद्यांचा नापाक डाव देशाच्या शूर जवानांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची आहुती देऊन हाणून पाडला.
हे ही वाचा:
धीरज साहूंनी जमिनीत पैसे लपवल्याची शक्यता; नव्या तंत्रज्ञानाने घेणार शोध
‘चकमकीत मारले गेलेले दहशतवादी त्याच जागी दफन’
कलम ३७०वरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भारतात दुफळी निर्माण करणाऱ्यांचा पराजय
मोहित पांडे बनले राम मंदिराचे पुजारी!
तसेच दहशतवाद्यांचा नायनाट करण्याच्या प्रतिज्ञाचा पुनरुच्चार करण्यास त्यांनी सर्वाना सांगितले.त्यांच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही,असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. मानवजातीसाठी धोका असणाऱ्या दहशदतवाद्यांना नष्ट करण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या.जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
१३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या संसद हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण झाली.पाकिस्तानस्थित असलेल्या लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या सुमारे पाच दहशतवाद्यांनी संसदेच्या संकुलावर हल्ला करून नऊ जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच कर्मचारी, एक CRPF अधिकारी, दोन संसदेचे वॉच आणि वॉर्ड कर्मचारी आणि एका माळीचा मृत्यू झाला होता.