ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाणार आहे. यासंदर्भात सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली असून राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर मंगळवार, १२ डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी अशी मागणी सातत्याने काही आमदार करत होते. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.
दिशा सालियानच्या मृत्यूच्या वेळी आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे या चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार आरोप केले होते. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी एसआटीमार्फत केली जाणार आहे.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
हे ही वाचा :
हमासची उत्तर गाझामध्ये शरणागती… इस्रायलचा दावा
मध्य प्रदेशात भाजपाचे धक्कातंत्र; शिवराजसिंह चौहानांऐवजी मोहन यादवांची मुख्यमंत्रीपदी वर्णी
सर्वोच्च न्यायालयाच्या ३७० संबंधीच्या निर्णयाचा बॉलीवूडला आनंद
शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या नरभक्षक वाघाला पकडा अन्यथा ठार करा!
दरम्यान, मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला. ८ जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.