भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत खळबळजनक आणि धक्कादायक दावा केला आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या लंडन दौऱ्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक इकबाल मिर्चीला भेटले, असा धक्कादायक दावा नितेश राणे यांनी केला आहे. इकबाल मिर्ची हा मुंबईच्या १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यातील एक फरार आरोपी आहे. तसेच तो मोठा ड्रग्ज तस्कर आहे. तो युरोपातून ड्रग्ज तस्करीचं काम करतो. तो सध्या इंग्लंडमध्ये असल्याची चर्चा सातत्याने सुरु असते. तो तिथून दाऊदच्या काळ्या दुनियेतलं कामकाज पाहतो.
कुख्यात आरोपी इकबाल मिर्चीला उद्धव ठाकरे भेटल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. शिवाय नितेश राणे यांनी त्यांच्या भेटीचे फोटो समोर आणण्याची धमकी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी खरं काय ते सागावं, नाहीतर फोटो समोर आणू, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय एकदा इकबाल मिर्चीला भेटले होते. तुमचे मालक लंडनमध्ये जाऊन इकबाल मिर्चीसोबत कांदे-पोहे खात असताना चालतात. मग प्रफुल्ल पटेल यांच्यावर कशाला आरोप करायचे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी सांगावं की, इकबाल मिर्ची लंडनमध्ये राहत असताना ते त्याच्यासोबत जेवले होते की नाही? मग पुढचा पुरावा आणि फोटो जाहीर करतो,” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
“युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे इतक्या दिवसांनंतर अधिवेशनामध्ये दिसले. कदाचित ते लंडनला जात असताना चुकून फ्लाईट नागपूरला लँड झालं असावं. पण, ठीक आहे. त्यांनीही काम शिकावं. अधिवेशनाला येताना ते घाबरतात का की वडिलांना सोबत घेऊन आले आहेत? याचाच अर्थ ते मुळात घाबरलेले आहेत,” अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे. “अदित्य ठाकरेंनी ८ जूनला दिशा सालियनसोबत पार्टी केली होती की नाही ते राज्याला एकदा तरी सांगावं,” असंही नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
काँग्रेस खासदार साहू यांच्याकडे मिळाली ३५१ कोटींची रोकड!
साडेतीनशे कोटींचं घबाड सापडण्यापूर्वी काँग्रेस खासदार साहू काळ्या पैशाने होते व्यथित
महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक
अमेरिकेत भारतवंशी जाणून घेणार राम मंदिराचा संघर्ष
रोहित पवार राजकारणातले ऑरी
यासोबतच नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “रोहित पवार हे राजकारणातले ऑरी आहेत. ऑरी जसा बॉलीवूडमध्ये काय करतो नेमकं त्याचं काम काय आहे? हे कुणालाच माहीत नाही. तसंच रोहित पवार देखील राजकारणात सध्या काय करतात हे कोणालाच माहीत नाही. कधी कुठेही दिसतात, कोणासोबतही दिसतात, त्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे कळायला नको का?” असा टोला नितेश राणे यांनी लगावला.