इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, गाझामध्ये आत्मसमर्पण करणाऱ्या शेकडो सैनिकांना अटक करण्यात आली असून ही या दहशतवादी गटाच्या नाशाची सुरुवात असल्याचे उद्गारही त्यांनी काढले. ७ ऑक्टोबरपासून गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १७ हजार १०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि ४८ हजार ७८० जखमी झाले आहेत. तर, युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलमध्ये जवळपास १२०० नागरिक मारले गेले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला असून या पार्श्वभूमीवर इस्रायलने हल्ले आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ‘युद्ध अजूनही सुरू आहे, परंतु ही हमासच्या नाशाची सुरुवात आहे. मी हमासच्या दहशतवाद्यांना सांगतोय, ते संपले आहेत. (याह्या) सिनवारसाठी मरू नका. आत्मसमर्पण करा आता,’ असे नेतान्याहू यांनी एका निवेदनात नमूद केले आहे. मात्र हमासने रविवारी इस्रायलला इशारा दिला की, गटाच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणीही ओलीस जिवंत सोडणार नाही. ‘वाटाघाटीशिवाय आणि कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय फॅसिस्ट शत्रू आणि त्याचे गर्विष्ठ नेतृत्व किंवा त्याचे समर्थक… कोणीही त्यांना जिवंत ताब्यात घेऊ शकत नाहीत’, अशा इशारा हमासच्या सशस्त्र शाखेचा प्रवक्ता अबू ओबेदा याने दिला आहे.
हे ही वाचा:
आपण देशासाठी काय देऊ शकतो ही भावना प्रत्येकाने जोपासावी
ट्रक चालक आता अनुभवणार ठंडा ठंडा कूल कूल
महाराष्ट्रात ISIS विरोधात NIA ची कारवाई, साकीब नाचनला अटक
आठ हजार कोटी चार महिन्यात खर्च कसे करायचे?
कतारच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान झालेला युद्धविरामाचा करार डिसेंबरच्या सुरुवातीलाच संपुष्टात आला आहे. त्यामुळे इस्रायली संरक्षण दलाने गाझामध्ये त्यांची भू-कारवाई सुरूच ठेवली आहे. रविवारी इस्रायली रणगाड्यांनी दक्षिण गाझाचे मुख्य शहर खान युनिसच्या मध्यवर्ती भागाकडे मोर्चा वळवला. लढाऊ विमानांनी पश्चिमेकडील भागाला लक्ष्य केले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दक्षिण गाझा हल्ल्यात इस्रायलने केलेल्या आक्रमणावर टीका केली. नागरिकांचे संरक्षण करण्याचा त्यांचा हेतू आणि जमिनीवर प्रत्यक्षात काय घडत आहे, यात तफावत असल्याकडे त्यांनी लक्ष घेतले. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमरून यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर, अमेरिकेच्या अध्यक्षांनी इस्रायलला सार्वजनिकरित्या दक्षिण गाझामध्ये अधिक हल्ले करण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी रात्री सीरियाची राजधानी दमास्कसच्या आजूबाजूच्या भागांत इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी हल्ले केल्याचा दावा तेथील सरकारने केला. मात्र याबाबत इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नेतान्याहू यांची पुतिन यांच्याशी चर्चा
रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी हमास विरुद्धच्या युद्धाबद्दल आणि प्रदेशातील परिस्थितीबद्दल चर्चा केली. जिथे त्यांनी संयुक्त राष्ट्र आणि इतर मंचांवर रशियन प्रतिनिधींनी इस्रायलच्या विरोधात व्यक्त केलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. रशिया आणि इराण यांच्यातील सहकार्य धोकादायक आहे, असेही नेतान्याहू म्हणाले.
गाझा उद्ध्वस्त
तर, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी गाझा उद्ध्वस्त झाल्याची माहिती दिली. ‘सार्वजनिक व्यवस्था लवकरच पूर्णपणे मोडीत निघणार आहे आणि याहूनही वाईट परिस्थिती उद्भवू शकेल. साथीचे रोग पसरण्याची भीती आहे आणि इजिप्तवर मोठ्या प्रमाणावर विस्थापनाचा दबाव वाढेल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली.