न्यूयॉर्क शहर त्याच्या आवाजासाठीही ओळखले जाते. येथील रहिवासी जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यावर प्रत्येक वेळी आवाजांचा भडिमार होत असतो… भुयारी मार्गावरील गाड्या… दूरवर चाललेले ड्रिलिंगचे काम… रात्री उशिरापर्यंत बार आणि क्लबमधून निघणारे नागरिक… सर्वांकडून शहराच्या ध्वनिप्रदूषणात भरच पडत असते. शहराच्या पर्यावरण संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या गोंधळाला कंटाळलेल्या न्यूयॉर्ककरांकडून दरवर्षी ५० हजारांहून अधिक आवाजाच्या तक्रारी दाखल केल्या जातात.
मोडिफाइड गाड्या, मोटारसायकलींमधून निघणारा आवाज आणि मोठमोठ्याने हॉर्न वाजवणारे ड्रायव्हर्स… हे ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींचा एक छोटासा भाग आहेत. मात्र शहराचा आवाज कमी करण्याच्या उद्देशाने या प्रकारच्या आवाजांवर आता ‘नॉइज कॅमेऱ्यां’चे लक्ष असणार आहे. जेव्हा ८५ डेसिबलपेक्षा मोठा आवाज होतो, तेव्हा हे कॅमेरे सक्रिय होऊन रेकॉर्डिंग सुरू करतात, अशी माहिती या विभागाचे आयुक्त रोहित अग्रवाल यांनी दिली.
पर्यावरण संरक्षण विभागाकडून या कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे. नवीन तंत्रज्ञान वेगवान वाहनांवर लक्ष ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांसारखे काम करतात. हे कॅमेरे नेहमी सुरूच असतात, परंतु जेव्हा मोठा आवाज होतो, तेव्हाच ते रेकॉर्डिंग सुरू करतात.
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास चालकांना ८०० ते अडीच हजार अमेरिकी डॉलरची किंमत मोजावी लागते. शहराने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पहिला नॉइज कॅमेरा बसवला. मॅनहॅटन आणि क्वीन्समधील अनेक ठिकाणी त्याची चाचणी घेण्यात आली. तेव्हापासून, शहराने नऊ अतिरिक्त कॅमेरे खरेदी केले आहेत, ज्याची किंमत प्रत्येकी ३५ हजार अमेरिकी डॉलर आहे. त्यापैकी सात गेल्या महिन्याच्या अखेरीस वापरात होते, उर्वरित वर्षाच्या अखेरीस बसवले जातील.
आता संपूर्ण शहरात नॉइज कॅमेरे बसवण्याच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी बुधवारी, सिटी कौन्सिलमध्ये एका विधेयकावर मतदान होणार आहे. प्रत्येक प्रभागात किमान पाच कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट आहे. हे विधेयक संमत होण्याची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
करणी सेना प्रमुखाच्या हत्याकांडातील आरोपींची ओळख पटली
१३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नुची भारताला धमकी
मुंबईतून ८ तोतया आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या
ठाकरेंचा विरोध की अदाणी परत या…ची हाळी
साउंडस्केपचा अभ्यास करणारे न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधन सहयोगी प्राध्यापक चार्ली मायडलार्झ यांनी आवाजाला ‘स्लो किलर’ संबोधले आहे. ‘गोंगाट लोकांना केवळ रस्त्यावरच गाठत नाही, तर त्याचा परिणाम हळूहळू लोकांवर होतो,’ असे ते म्हणतात. काहींना मात्र नवीन तंत्रज्ञानामुळे न्यूयॉर्कच्या नागरिकांच्या गोपनीयतेला धोका निर्माण झाला आहे, असे वाटते. लीगल एड सोसायटीच्या डिजिटल फॉरेन्सिक्स युनिटचे वकील जेरोम ग्रेको यांच्या मते, कॅमेरे किती चांगले काम करतात आणि त्याची माहिती कोणाला मिळणार, याबद्दलही विविध शंका आहेत. ‘जेव्हा अशाप्रकारच्या बाबी करण्यास सक्षम असणारे तंत्रज्ञान तुमच्याकडे येते, तेव्हा त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही बळावते,’ असे ग्रेको सांगतात.