तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि इतर राज्यात भाजपा जिंकली की इव्हीएमवर शंका, अशी टीका करत उद्धव ठाकरे किती रडारड करणार असा खोचक सवाल भाजपाने उद्धव ठाकरेंना केला आहे. उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? असाही सवाल उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली होती. त्यावर भाजपाने चोख उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर हा राजकारणाचा मुद्दा नाही तो अस्मितेचा मुद्दा आहे. राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता 22 जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे,” अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहे. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असे देखील ते या वेळी म्हणाले. मंगळवार, ५ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले.
दरम्यान, सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी १६ डिसेंबर रोजी धारवीहून अदानीच्या कार्यालायवर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. शिंदे सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.
हे ही वाचा:
जेडीयूच्या खासदाराने पंतप्रधान मोदींचे केले कौतुक म्हणाले, ‘मोदी है तो मुमकिन है’!
महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार
‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!
राज्यात ७५ ठिकाणी नाट्यगृह उभारणीसाठी ३८६ कोटींचा निधी देणार
“शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पीक विमा घोटाळा वेगळा विषय आहे त्यावरही बोलणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना एक अधिवेशन झालं होतं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांचं दोन लाखाचं कर्ज माफ केलं होतं. त्यामुळे शेतकरी तारला होता. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारली होती. थोतांडं नाटकं बंद करा. कर्जमुक्ती करा. घोषणा करून भुलभुलैय्या करू नका,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.