खलिस्तानी लिबरेशन फोर्सचा प्रमुख खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा २ डिसेंबर रोजी पाकिस्तानमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिली. खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे हा जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या होता.
लखबीर सिंग रोडे याला यूएपीए कायद्यांतर्गत ‘आतंकवादी’ म्हणून घोषित केले गेले होते.त्यामुळे लखबीर सिंग रोडे हा पाकिस्तानमध्ये पळून गेला होता आणि लाहोरमध्ये स्थायिक झाला होता.तो अमली पदार्थ, शस्त्रे, स्फोटके आणि टिफिन बॉम्ब पंजाबमध्ये पाठवत होता, असे सूत्रांनी सांगितले. राज्यातील प्रमुख व्यक्तींच्या हत्येचा कट रचण्यातही त्याचा सहभाग असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
‘सीआयडी’ अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन!
थायलंडमध्ये बस अपघातात १४ जण ठार, २० जखमी!
जेडीयूच्या खासदाराने पंतप्रधान मोदींचे केले कौतुक म्हणाले, ‘मोदी है तो मुमकिन है’!
महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार
१९८५ साली एअर इंडिया विमानावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात रोडे याचा हात असल्याचा त्याच्यावर आरोप होता.राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने सुद्धा रोडे विरुद्ध मोठी कारवाई केली होती. एनआयएने ऑक्टोबरमध्ये पंजाबमधील मोगा येथे छापा टाकून लखबीर सिंग रोडे याची मालमत्ता जप्त केली होती. २०२१ ते २०२३ या कालावधीत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रोडे यांच्याविरुद्ध सहा दहशतवादी खटल्यांसंदर्भात छापे टाकण्यात आले होते.