एका महिलेलाही बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले जाऊ शकते का? सर्वोच्च न्यायालय आता यावर विचार करणार आहे. आतापर्यंत भारतीय दंड संहितेच्या कलम ३७५नुसार केवळ पुरुषांनाच बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले जाते. मात्र याच कलमांच्या आधारे महिलेलाही आरोपी केले जाऊ शकते का, यावर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे.
हे संपूर्ण प्रकरण ६२ वर्षीय विधवा महिलेच्या याचिकेच्या संदर्भात आहे. या महिलेच्या दाव्यानुसार, तिच्या मुलाविरुद्ध दाखल खोट्या बलात्कार गुन्ह्यात तिलाही गोवण्यात आले आहे. महिलेने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. या प्रकरणी न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. संजय करोल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्पष्ट केले की, भारतीय दंडसंहिते अंतर्गत केवळ पुरुषांनाच बलात्काराचे आरोपी केले जाऊ शकते. या प्रकरणी आता पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होईल. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने तिला अटकेपासूनही संरक्षण दिले आहे.
हे ही वाचा:
मुंबई महापालिकेतील कथित ऑक्सिजन प्लँट घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार
तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक
युजवेंद्र चहलच्या निवडीवरून हरभजन सिंगने बीसीसीआयला सुनावले!
२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक
काय आहे प्रकरण?
६२ वर्षीय विधवा महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेचा मुलगा आणि एक महिला ऑनलाइन नात्यात होते. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी लग्नही केले. मात्र या महिलेच्या कुटुंबीयांनी हे लग्न मोडण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर समेट होऊन त्या महिलेला ११ लाख रुपये देण्यात आले. तरीही या महिलेने ही विधवा महिला आणि तिच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या विधवा महिलेने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.