अमेरिकेतील मिसुरी येथे अनेक महिने ओलीस ठेवलेल्या २० वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची अखेर अमेरिकन अधिकाऱ्यांनी सुटका केली.पीडित मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती तसेच त्याला बाथरूममध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.या प्रकरणात विध्यार्थाचा चुलत भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांचा समावेश आहे.पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
पीडित विद्यार्थी गेल्या वर्षी भारतातून अमेरिकेत मिसूरी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिकण्यासाठी गेला होता.पीडित मुलाला त्याच्या चुलत भावाने मारहाण करत तीन वेगवेगळ्या घरात अनेक महिने ओलीस ठेवले.पोलिसांना याची माहिती मिळताच बुधवारी सेंट चार्ल्स काउंटीमधील ग्रामीण महामार्गावरील आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.व्यंकटेश आर सत्तारू, श्रावण वर्मा पेनुमेच्चा आणि निखिल वर्मा पेनमत्सा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.यांच्यावर मानवी तस्करी, अपहरण आणि प्राणघातक हल्ला असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित विद्यार्थ्याची प्रकृती कळताच एका स्थानिक नागरिकाने ९११ वर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली. सध्या पीडित विद्यार्थी सुखरूप असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने पीडित मुलाला सात महिने तळघरात ओलीस ठेवले होते, असे आरोपात म्हटले आहे. त्याला जमिनीवर झोपायला लावले. या काळात पीडित मुलाला बाथरूममध्येही जाऊ दिले जात नव्हते, असे आरोप पीडित मुलाने केला आहे.
पीडित मुलगा म्हणाला की , ‘एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी असा कसा वागू शकतो.हे अमानवीय आहे. तपासकर्त्यांनी वेंकटेश आर सत्तारु ( पीडित मुलाचा चुलत भाऊ) याला गुन्हेगार म्हणून ओळखले आहे.आरोपी सत्तारु हा आपली पत्नी आणि दोन मुलांसह ओ’ फॉलॉनमध्ये राहतो. मुख्य आरोपी सत्तारू याच्यावर गुलामगिरी आणि कागदपत्रांचा गैरवापर करण्याच्या हेतूने मानवी तस्करीचाही आरोप ठेवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मुंबईत ‘रन फॉर विवेकानंद’ मॅरेथॉनचे आयोजन!
रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने अमेरिकेत रचला इतिहास!
महाराष्ट्रातील कैद्यांची आता चंगी, कैद्यांना मिळणार पाणीपुरी, आईस्क्रीम!
अनिल देशमुखांना हवं होतं मंत्रिपद; पण भाजपाचा नकार
अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय विद्यार्थी मिसूरी विद्यापीठात शिक्षण घेण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी भारतातून अमेरिकेत आला होता. एप्रिलच्या सुरुवातीला त्याला आरोपी सत्तारू याच्या घरी नेण्यात आले.तिथे त्याला पहाटे साडेचार वाजेपर्यंत काम करायला लावले.पीडित मुलाने पोलिसांना सांगितले की, तो दररोज फक्त तीन तास झोपत असे.मी जर काम नीट केले नाहीतर मला मारहाण केली आणि विवस्त्र करण्यास भाग पाडले, असे पीडित मुलाने सांगितले.
बुधवारी सकाळी पोलीस सत्तारू यांच्या घरी पोहोचले, मात्र तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांना सांगितले की, ते आत येऊ शकत नाहीत. दरम्यान, पीडित मुलगा तळघरातून धावत बाहेर आला. त्याच्या शरीरावर प्राणघातक हल्ल्याच्या खुणा दिसून येत होत्या आणि तो भीतीने थरथर कापत होता, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलगा पुढे म्हणाला की, मला जबर मारहाण करण्यात आली. तसेच मला विजेचे झटके देण्यात आले,उपाशी ठेवले जात होते आणि क्वचितच मला बाथरूममध्ये जाऊ दिले जात असे.पीडित मुलाला वाचविण्यासाठी ज्या नागरिकाने मदत केली त्याचे पीडित मुलाने कौतुक करून आभार मानले.
तिन्ही आरोपी हे श्रीमंत घराण्यातील असून त्यांचे भारतात राजकीय संबंध असल्याचे पीडित मुलाने सांगितले.