इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या तात्पुरत्या युद्धविरामदरम्यान जेरुसलेममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला. जेरुसलेममध्ये दोन हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला.
स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी ७.४० वाजता हा दहशतवादी हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पॅलेस्टिनी हल्लेखोर वेझमन रस्त्यावर वाहनातून उतरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले तर त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.दोन ऑफ ड्यूटी सैनिक आणि एका सशस्त्र नागरिकानेही हल्लेखोरांवर तात्काळ गोळीबार केला. यामध्ये दोन्ही दहशतवादी मारले गेले आहेत.
या हल्ल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोक बस स्टॉपवर उभे राहून वाट पाहत आहेत, तेव्हा अचानक दोन हल्लेखोर आले आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली.
इस्रायलची सुरक्षा एजन्सी शिन बेटने दिलेल्या माहितीनुसार, मुराद नम्र (३८) आणि इब्राहिम नम्र (३०) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. हे दोघेही हमासशी संबंधित असून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांना यापूर्वी तुरुंगवासही भोगावा लागला आहे. २०१०ते २०२० दरम्यान दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याच्या आरोपाखाली दहशतवादी मुराद याला अनेक वेळा तुरुंगात टाकण्यात आले आहे.तसेच दुसरा दहशतवादी इब्राहिम २०१४ मध्ये तुरुंगात जाऊन आला होता, असे सुरक्षा एजन्सी शिन बेटने माहिती दिली.
हे ही वाचा:
प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करुन अटक करा!
इस्रायल-हमास युद्धविरामत एक दिवसीय वाढ!
‘भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांना प्रशिक्षण’
बंधुभावानेच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद टिकवला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांकडे एम-१६ असॉल्ट रायफल आणि एक हँडगन होती. हल्लेखोरांच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. पोलीस आजूबाजूच्या संपूर्ण परिसराचीही चौकशी करत आहेत.या हल्ल्यात २४ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एका महिला आणि एका पुरुषाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्या स्टॉपवर हा दहशतवादी हल्ला झाला त्याच स्टॉपवरही वर्षभरापूर्वी हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.इस्रायल आणि हमास यांनी युद्धविराम एक दिवसीय वाढ करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळी गुरुवारी सकाळी हा दहशतवादी हल्ला झाला.
दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. सुमारे ४७ दिवसांच्या युद्धानंतर दोघांमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला. या युद्धबंदी अंतर्गत हमास ओलिसांची सुटका करत आहे, तर इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करत आहे. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत सुमारे १५ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासच्या हल्ल्यात १,२००इस्रायली मारले गेले आहेत.