घरात बसून काम करणाऱ्या आणि फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवण देणं योग्य नाही, अशी घाणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना युद्ध पातळीवर मदत करता यावी यासाठी निर्णय घेण्यात आला. बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी माझं काम करतो. आम्ही सरकार म्हणून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करतो. हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि संस्कृती विसरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. तो कार्यक्रम म्हणजे आरोप करणं. खालच्या पातळीवर भाषा वापरणं हे आमच्या संस्कृतीत नाही. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती, परंपरा आहे,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
४१ मौल्यवान जीवांना वाचवणाऱ्या व्यक्तींचे महिंद्रा यांनी मानले आभार
सरकारने ७० लाख मोबाईल नंबर केले रद्द!
‘शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख असे पदच नाही’
‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!
“जे घरात बसून काम करत होते, फेसबुक लाईव्ह करुन काम करत होते त्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना शिकवणं योग्य आहे का? मला वाटतं महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील आपल्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल लिहिलेलं आहे. त्यामुळे मी त्यावर जास्त बोलू इच्छित नाही,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.