उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वतीने सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख असे पदच नसल्याने सर्व निर्णय हे पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे घेतात, हे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे खोटे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी स्पष्ट केले. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरील सुनावणीदरम्यान मंगळवारी ते बोलत होते.
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर मंगळवारी सुनावणी सुरू झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेण्यात आली. प्रभू यांची उलटतपासणी गुरुवारपर्यंत चालेल आणि सुनावणी या आठवड्यार्यंत चालेल असे समजते.
‘ठाकरे गटाने विधानसभाध्यक्षांना सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार, शिंदे गटातील दिलीप लांडे यांच्यासारख्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये असल्याचा दावा उद्धव गटाने केला आहे. मात्र त्या स्वाक्षऱ्या आमदारांच्या नसल्याचा दावा जेठमलानी यांनी केला.
शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे सन १९९९मध्ये सादर केलेल्या घटनेच्या कागदपत्रांनुसार, पक्षामध्ये पक्षप्रमुख असे पदच अस्तित्वात नाही. त्यामुळे पक्षप्रमुख हे पद बेकायदा असल्याचे स्पष्ट केले. मात्र प्रभू यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले.
’२१ जून, २०२२ रोजी कोणताही व्हिप जाहीर केला नव्हता. तो बोगस व्हिप होता आणि ती फसवणूक होती. व्हिपचे पालन करण्यात आले नाही आणि आमदारांनी त्या बैठकीला हजेरी लावली नाही, या संपूर्ण दाव्यावर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनील प्रभू यांनी २१ जून रोजी व्हिप जाहीर केला, या मुद्द्यावर आपण उलटतपासणी सुरू केली आहे. मात्र प्राथमिक स्तरावर पाहिल्यास हा दावा बोगस असून असा कोणताही व्हिप जाहीर करण्यात आला नव्हता,’ असे जेठमलानी यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा
ठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले
१७ दिवसांनी त्या कामगारांनी पाहिला प्रकाश
३१ ऑक्टोबर, २०१९ रोजी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना सर्व अधिकार प्रदान करण्याच्या शिवसेनेच्या ठरावावरही जेठमलानी यांनी प्रभू यांना प्रश्न विचारले. तसेच, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याबाबत शिंदे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, त्यांच्या नियुक्तीसाठी २१ जून, २०१८ रोजी अशी कोणतीही बैठक झाली नव्हती, असा दावा शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला होता.