वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करणारा ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा चमकला. भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ४८ चेंडूंत तब्बल १०४ धावांची झंझावाती खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. भारताने केलेली ३ बाद २२२ ही धावसंख्या ऑस्ट्रेलियाने पार केली. मॅक्सवेलच्या या शतकी खेळीत ८ चौकार आणि ८ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. मॅक्सवेलच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळविला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी भारताची आघाडी कमी केली आहे.
मॅक्सवेलला साथ लाभली ती कर्णधार मॅथ्यू वेडची. त्याने २८ धावांची नाबाद खेळी केली पण त्या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे वर्ल्डकपमधील अफगाणिस्तानविरुद्धची त्याची खेळी पुन्हा एकदा आठवली. त्यावेळीही एकहाती त्याने तो सामना खेचून आणला होता. या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशा पिछाडीपासून ऑस्ट्रेलियाचा बचाव झाला. अखेरच्या षटकात तर भारताने ३० धावा दिल्या त्याचा फटका भारताला बसला.
हे ही वाचा:
शब्द मागे घेऊन, विषय संपेल का?
बिहार सरकारने कमी केल्या हिंदू सणांच्या सुट्ट्या, मुस्लिम सणांवर सरकार मेहेरबान!
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंचा जामीन अर्ज फेटाळला
स्टॅलिन, अखिलेश यांच्या उपस्थितीत व्ही.पी. सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे आश्चर्य
अखेरच्या षटकात २१ धावांची गरज होती. पण मॅक्सवेलचे नशीब त्याला साथ देत होते. त्याला धावचीत करण्याची संधी भारताने गमावली होती. भारताच्या ऋतुराज गायकवाडने शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात भारताला यश आले. ऋतुराजने १२३ धावांची नाबाद खेळी केली. त्यात १३ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. पण त्याच्या या खेळीवर मॅक्सवेलने पाणी फेरले. भारताच्या ३ बाद २२२ धावसंख्येला ऑस्ट्रेलियाने ५ बाद २२५ असे उत्तर दिले.