मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा सुधारण्याच्या मार्गावर येत आहे. रविवार, २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत अचानक पावसाने हजेरी लावली. मुंबईत झालेल्या या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली असली, तरी हवेची गुणवत्ता सुधारण्यास मात्र मोठी मदत झाली आहे.
रविवारी मुंबई उपनगरासह राज्यातही विविध ठिकाणी पावसाची हजेरी होती. यामुळे मुंबईतील बिघडलेली हवेची पातळी पुर्वपदावर येताना दिसत आहे. दिवाळीपूर्वी मेट्रो आणि इतर बांधकाम यामुळे हवेची गुणवत्ता घसरली होती. त्यानंतर दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी झाली आणि मुंबईतील हवेचा दर्जा घसरला. राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीतही परिस्थिती भीषण होती.
पण, आता अवकाळी पावसानंतर मुंबईच्या हवा गुणवत्तेत सुधारणा होताना दिसत आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI १०० च्या खाली आहे. बीकेसीमधील AQI १०३ वर आहे. शिवाय सोमवारीही मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे, पुढील तीन ते चार दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
आयपीएलच्या कोलकाता संघातून शार्दुल ठाकूर बाहेर!
दुसऱ्या टप्प्यात १३ इस्रायली, १४ थायलंडचे नागरिक रेड क्रॉसला सुपूर्द!
मराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक,ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासलं काळं!
दगडफेकीच्या घटनेबाबत नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा!
मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी चांगलीच खालावली होती. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी २८८ वर जाऊन पोहोचली होती. आता हळूहळू मुंबईतील हवेचा दर्जा सुधारत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून बांधकामे स्थगित करण्यासाठीचे निर्देश देण्यात आले होते.
मुंबईतील हवेची गुणवत्ता
- एकूण मुंबई – ६० AQI
- कुलाबा – ७६
- भांडुप – ३७
- वरळी – ३३
- बोरिवली – ६५
- बीकेसी – १०३
- चेंबूर – ८९