गुजरातमधील मोरबी येथील पोलिसांनी एका दलित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आणि त्याच्या प्रलंबित पगाराच्या मागणीसाठी त्याच्या तोंडात पादत्राणे धरण्यास भाग पाडल्याप्रकरणी एका व्यावसायिक महिलेसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नीलेश दलसानिया हा २१ वर्षीय दलित तरुण ऑक्टोबरच्या सुरुवातीला रु. १२,००० च्या मासिक पगारावर राणीबा इंडस्ट्रीज प्रा.लि.या कंपनीत कामाला लागला. या कंपनीचे मालक विभूती पटेल हे आहेत. मात्र, १८ ऑक्टोबर रोजी या तरुणाचा करार अचानक संपुष्टात आला व त्याला नोकरी सोडावी लागली. त्यांनतर नीलेश दलसानिया याने १६ दिवस काम केल्याचा पगार कंपनीचे मालक पटेल यांच्याकडे मागितला.परंतु पटेल यांनी दुर्लक्ष करत कर्मचाऱ्यासोबत बोलणे टाळले.
बुधवारी संध्याकाळी दलित कर्मचारी दलसानिया, त्याचा भाऊ आणि शेजारी यांच्यासमवेत विभूती पटेल यांच्या कार्यालयात गेले असता, व्यावसायिक महिलेचा भाऊ ओम पटेल आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला.
हे ही वाचा:
गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!
‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’
रिंकू सिंहचा विजयी षटकार; परंतु ना त्याला फायदा झाला, ना संघाला
विजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कंपनीचे मालक विभूती पटेल यांनी कर्मचारी दलसानियाला थोबाडीत मारली व व्यापारी संकुलाच्या टेरेसवर नेले व तेथील इतर कर्मचार्यांनी मिळून दलसानियाला जोरदार मारहाण केली.एफआयआरनुसार, परीक्षित पटेल, ओम पटेल आणि अज्ञात व्यक्तींनी दलसानिया यांना लाथ मारली आणि ठोसे मारले व बेल्टने मारहाण केली.
पगाराची मागणी केल्याबद्दल विभूती पटेल यांनी दलसानिया यांना पादत्राणे तोंडात घालण्यास भाग पाडले व माफी मागवून घेतली.तसेच या परिसरात पुन्हा दिसल्यास अधिक नुकसान होईल अशी धमकीही देण्यात आली, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. शिवाय,आरोपीने या घटनेचे चित्रीकरण केले.
मारहाणीनंतर दलित व्यक्तीला मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.या प्रकरणी पोलिस उप अधीक्षक प्रतिपालसिंह झाला म्हणाले की, सर्व आरोपींवर प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी धमकी, दंगल आणि एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंध) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्व आरोपींच्या घरांची झडती घेतली, मात्र कोणीही सापडले नाही. त्यांना शोधण्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आल्याचे पोलिस उप अधीक्षक प्रतिपालसिंह झाला यांनी सांगितले.