उद्धव वाकरे आणि आदित्य वाकरे यांनी स्वतःला सोनिया हृदय सम्राट राहुल हृदय सम्राट आणि शरद हृदय सम्राट अशा पदव्या लावून घ्याव्यात शिवसेना प्रवक्त्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे यांची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका.
भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदूहृदयसम्राट’ असा केला आहे. त्यावरून ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत आहे.ठाकरेंच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारे प्रत्युत्तर दिलं आहे.प्रा डॉ ज्योती वाघमारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत ठाकरे कुटुंबाचा समाचार घेतला.
डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे विश्वातले एकमेव हिंदुहृदयसम्राट आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वतःला कधीही हिंदुहृदयसम्राट म्हटलं नाही. तसेच आमच्या पक्षाची अशी भूमिकाही नाही.आमच्या मनात आजही फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. पण जे काही लोक आमच्यावर टीका करत आहेत, त्यांना एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट म्हणायला लाज वाटत होती.याच लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांचं ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे असे नामांतरण केलं होतं. बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार, त्यांचे तत्व,सत्व,पक्ष आणि स्वाभिमानाला गहाण टाकणारे तुम्ही आज आमच्यावर कोणत्या तोंडाने टीका करत आहात.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची काही स्वप्न होती.ती म्हणजे अयोध्येत राम मंदिर बनले पाहिजे, जम्मू-काश्मीर मधील ३७० कलम हटवले पाहिजे.बाळासाहेबांची ही स्वप्ने देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी हे पूर्ण करत आहेत आणि बाळासाहेबांच्या या स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना साथ देण्याचे काम करत असल्याचे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
गाडीमध्येच गोळ्या झाडलेल्या भारतीय तरुणाचा अमेरिकेत मृत्यू!
‘पंतप्रधान मोदी यांनी धीर दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला’
रिंकू सिंहचा विजयी षटकार; परंतु ना त्याला फायदा झाला, ना संघाला
विजयपत सिंघानियांची उद्विग्नता; गौतम सिंघानिया रेमंडला उद्ध्वस्त करतोय!
डॉ. ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या, आमचा तुम्हाला एक सवाल आहे, जर तुम्ही आमच्या मनात कोण आहेत बघितलं, तर फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच दिसतील.परंतु उद्धवजी वाकरे आणि आदित्यजी वाकरे तुमच्या मनात कोण आहे?. तुमच्या मनात जर डोकावून पाहिलं तर आम्हाला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी सापडतील परंतु बाळासाहेब ठाकरे सापडणार नाहीत.कारण बाळासाहेबांचे विचार तुम्ही गहाण टाकून खुर्ची मिळवली होती.
त्यामुळे उद्धवजी वाकरे आणि आदित्यजी वाकरे तुम्ही इथून पुढे तुमच्या नावापुढे राहुल हृदयसम्राट,सोनिया हृदयसम्राट किंवा शरद हृदयसम्राट या उपाध्या लावाव्या.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कधीही स्वतःला पक्षप्रमुखम्हणवून घेतलं नाही, ते आजही स्वतःला पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणवतात. मात्र, दुसरीकडे उद्धवजी वाकरे हे स्वतःला सन्माननीय, पक्षप्रमुख म्हणवून घेतात.पण उद्धवजी वाकरे एक लक्षात ठेवा शिवसेना प्रमुख हे एकमेव होते ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे, अशी घणाघाती टीका ज्योती वाघमारे यांनी केली.
पुढे म्हणाल्या, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाला नाव देण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले.मात्र, उद्धवजी वाकरे यांनी पक्षाला नाव दिले,ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.इथेच लक्षात येतं ते म्हणजे, रक्तांचा वारसदार हा विचारांचा वारसदार होऊ शकत नाही.हिंदुहृदयसम्राट एकच ते म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत.