विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाबद्दल अनेक खेळाडू आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. विश्वचषक स्पर्धेतील पराभवाचे शल्य कायम राहणार असले तरी या पराभवाने आम्हाला आणखी कष्ट करण्यासाठी प्रेरित केल्याचे कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनीही म्हटले आहे.
‘चेन्नईपासून सुरू झालेल्या आमच्या प्रवासाचा अहमदाबादमध्ये निराशाजनक शेवट झाला. मात्र गेले सहा आठवडे आम्ही जी कामगिरी केली आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अतिव दुःख झाले असले तरी पुढील संधीसाठी आम्हाला आणखी कष्ट करण्यासाठी प्रेरित केले आहे,’ अशी प्रतिक्रिया कुलदीप याने ‘एक्स’वर पोस्ट केली.
‘पराभवाचे शल्य कायम असले तरी आपल्याला पुढे जावेच लागते. आयुष्य सुरूच राहते आणि जखम बरी होण्यास वेळ लागतो. अर्थात, या पराभवाला सामोरे जाणे कठीण आहे,’ असेही कुलदीप याने म्हटले आहे.
‘विश्वचषक स्पर्धा सुंदर झाली. मात्र देवाच्या मनात वेगळेच काही होते. आता या क्षणी जे काही आहे ते सर्व बंद करून पुन्हा रिचार्ज होण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारच्या पराभवाचा सामना करणे कठीण आहे. परंतु आम्हाला आमच्या कर्तृत्वावर आणि प्रवासावर विश्वास ठेवून मार्गक्रमणा करायलाच हवी,’ असे कुलदीप म्हणाला. कुलदीपने विश्वचषक स्पर्धेतील सर्व ११ सामने जिंकले आणि २८.२६च्या सरासरीने १५ विकेट घेतल्या.
सिराजनेही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘आम्हाला जसा अपेक्षित होता, तसा शेवट झाला नाही. मात्र भारताचे प्रतिनिधीत्व करणे ही सर्वांत मोठी अभिमानास्पद बाब आहे आणि माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करणे, हेच माझे ध्येय होते, असे सिराजने सांगितले.
हे ही वाचा:
तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी हैदराबादमध्ये कारमधून ५ कोटींची रोकड जप्त!
इस्रायल-हमास चार दिवस युद्धविराम; हमास करेल १३ ओलिसांची सुटका!
सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू
प्रकाश राज यांना १०० कोटी रुपयांच्या घोटाळयाप्रकरणी ईडीचे समन्स
‘आमची निराशा आणि दुःख व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील. हा पराभव सहन करणे कठीण आहे. यावेळी कदाचित देवाची इच्छा नव्हती परतु आम्ही आता देशाला पुन्हा अभिमानाचे क्षण मिळवून देण्यासाठी दिवसरात्र कष्ट करू,’ असेही तो म्हणाला. सिराजने देशभरातील चाहत्यांचे पाठिंब्यासाठी आभारही मानले. दोन्ही खेळाडूंनी आपल्या सपोर्ट स्टाफचेही आभार मानले आहेत.