शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचेकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले होते, त्याला फार दिवस लोटले नाहीत. अचानक या पक्षाला जरांगेंचा फोकस हलला असल्याचा साक्षात्कार झालेला आहे. पक्षाचा चेहरा बनलेल्या सुषमा अंधारे यांनी तशी जाहीर टीका केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांची अंधारे बाईंनी जोरदार पाठराखण केली आहे. हे अचानक असे काय घडले? ठाकरेही ही तारेवरची कसरत का करतायत, असा प्रश्न लोकांना पडलाय.
रोखठोक भूमिका घेणे हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव नाही. आज एक बोलायचे उद्या दुसरे, आज याच्या बाजूने बोलायचे उद्या त्याच्या ही त्यांची तऱ्हा आहे. परंतु जरांगेंच्या मुद्द्यावर ते इतक्या लवकर पलटी मारतील असे वाटले नव्हते. कारण राज्यात सध्या जरांगेंची हवा आहे.
मराठा आंदोलनाच्या सुरूवातीच्या काळात मनोज जरांगे हे आंदोलन योग्य पद्धतीने पुढे नेतायत, या शब्दात त्यांनी कौतुक केले होते. जालन्यात झालेल्या लाठीमाराची तुलना थेट जालियनवाला बागेतील हत्याकांडाशी केली होती. हे स्वाभाविक सुद्धा होते. जरांगे राज्य सरकारच्या विरोधात एल्गार करीत होते. आंदोलन जर पेटले तर ते शेकणार राज्य सरकारला. त्यामुळे ठाकरेंना यात राजकीय फायदा दिसत होता. त्यातून जरांगेंचे कौतुक सुरू होते.
अवघ्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांचे मत परीवर्तन झालेले दिसते. ठाकरेंनी सवयीनुसार घुमजाव केले. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे फक्त जरांगेंचा फोकस हलतोय एवढं बोलून थांबल्या नाहीत. त्यांनी जरांगेचा दुटप्पीपणा उदाहरणांसह स्पष्ट केला. एका बाजूला म्हणायचे की, आम्ही मागास आहोत आणि दुसऱ्या बाजूला जेसीबीतून फुलांची उधळण करून घ्यायची, सभांसाठी १५० एकराची संत्र्यांची बाग साफ करायची. आम्ही मागास आहोत असेही म्हणायचे आणि भुजबळांनी आमच्या हाताखाली काम केले होते, अशीही विधाने करायची या तमाम बाबींवर बोट ठेवले आहे.
जरांगेवर टीका करत असताना अंधारे यांनी भुजबळांची जोरदार पाठराखण केली. भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांनी समता परिषदेसारखे आंदोलन उभे केले. त्यामुळे टीका करताना त्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला दिला. जरांगे सुरूवातीला मराठा आरक्षणासाठी लढत होते. आता ते वैयक्तिक टीका करतायत, हा अंधारेंचा आक्षेप आहे. ठाकरे अडचणीत आणणारे विषय संजय राऊत आणि अंधारे बाईंच्या तोंडून वदवून घेतात. अंधारेंबाईंची जरांगेंवरील टीका त्याला अपवाद असण्याचे काही कारण नाही.
फ्क्त बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला सुषमा अंधारे यांनी द्यावा हाच मोठा विनोद आहे. ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि तारतम्य याचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. हा सल्ला सर्वात आधी संजय राऊत यांना देण्याची गरज आहे. बूमच्या गर्दीसमोर रोज सकाळी होणारा संजय राऊतांचा मॅटीनी शो आणि तारतम्याचा कधी संबंध असतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा, पत्रकार परिषदा यात तारतम्य कधी दिसते. परंतु अडचण अशी की या तिघांना हा सल्ला देण्या इतकी अंधारे बाईंची उंची नाही. अगदी धारिष्ट्य करून सल्ला देण्याचे ठरवलेच तर त्या आधी स्वत:ची शेलकी विधाने त्यांना बंद करावी लागतील.
अचानक अंधारेबाईंना आणि त्यांच्या पक्षाला भुजबळांचा कळवळा का आला या प्रश्नाचे उत्तर फार कठीण नाही.
जरांगे यांनी तारतम्य पहिल्यांदा सोडलेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काड्या करण्याची टीका करताना त्यांची भाषा कुठे सरळ होती? तेव्हा शिउबाठाच्या नेत्यांनी मजा घेतली. कारण ते फडणवीसाविरुद्ध बोलत होते.
सध्या जरांगे विरुद्ध भुजबळ असा सामना रंगलेला दिसत असला तरी प्रत्यक्षात तो मराठा विरुद्ध ओबीसी असाच आहे. आपण जरांगेच्या बाजूने बोलत राहिलो तर उगाच ओबीसी दुखावतील. याच आशंकेतून भुजबळांची पाठराखण करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा:
डीपफेक लोकशाहीसाठी नवा धोका; आळा घालण्यासाठी नियमन करणार
इस्लामविरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या हाती नेदरलँडची सत्ता?
मोसाद निघणार हमास दहशतवाद्यांच्या शोधात!
जिल्हा बसस्थानकांवर सुरू होणार आपला दवाखाना
एका बाजूला तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याच्या निमित्ताने विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसमधील ओबीसी नेतृत्व विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. त्यांच्या भूमिकेशी फारकत घेतलेली आहे. हेच वडेट्टीवार अंबडमधील सभेत भुजबळांसोबत एकाच व्यासपीठावर होते. एकाकी असल्याचे पाहून शिउबाठाने मौका साधला. अंधारेबाई भुजबळांची भलामण करून मोकळ्या झाल्या. जरांगेंना त्यांनी फटकारले.
राज्यात जातीच्या समीकरणांचा धुरळा उडत असताना सुषमा अंधारेंना तारतम्य सुचते आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही मराठा नेते मूकदर्शक बनले आहेत. कालाय तस्मै नम: दुसरे काय?
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)