मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वप्नाच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टीव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल २०२४ कार्यक्रमाची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते. मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक ब्रिंदा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी उपस्थित होते.
हेही वाचा..
जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!
आठ वर्षांनंतर उलगडला ‘लव्ह जिहाद’चा कारनामा; पती हिंदू नसल्याचा पर्दाफाश
मोसाद निघणार हमास दहशतवाद्यांच्या शोधात!
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी यांचे निधन
मंत्री महाजन म्हणाले की,नऊ दिवसीय महोत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूड फेस्टिव्हल सादर केले जातील. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे आणि उद्योगात नवीन संधी आणि मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.’मुंबई फेस्टिव्हल २०२४’ हा केवळ एक कार्यक्रम नाही; हा एक परिवर्तनकारी अनुभव आहे, जो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महा शॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष महिंद्रा म्हणाले की, मुंबई फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्स एकत्र येत असून हा फेस्टिव्हल एक वेगळा अनुभव देणारा आहे. या फेस्टिव्हलमुळे मुंबईच्या संस्कृतीचे एकत्रित दर्शन होईल. शिवाय सर्व मुंबईकरांना एकत्र आणण्यात या फेस्टिव्हलचा खूप मोठा वाटा असेल. ‘प्रत्येकजण आमंत्रित आहे,’ ही फेस्टिव्हलची संकल्पना अत्यंत समर्पक आहे. मुंबईतील कला, संस्कृती, क्रीडा, फॅशन आणि बरेच काही एकत्र करून अनेक कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होता येणार आहे. हा फेस्टिव्हल केवळ एक कार्यक्रम नसून रसिकांसाठी हा अवर्णनीय आनंद असेल, असे महिंद्रा म्हणाले.