ब्रिक्सचे सदस्यत्व मिळण्यासाठी पाकिस्तानने अर्ज केला आहे. सन २०२४मध्ये रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सची परिषद होणार असल्याने रशियाच्या पाठिंब्याच्या जोरावर पाकिस्तानला सदस्यत्व मिळण्याची आशा वाटू लागली आहे.
पाकिस्तानने ब्रिक्स गटाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला असून त्यासाठी रशियाचा पाठिंबा मागितला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे रशियामधील राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी दिली.
रशियाच्या अध्यक्षतेखाली सन २०२४मध्ये होणाऱ्या ब्रिक्स गटात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे.‘या महत्त्वाच्या संस्थेचा एक भाग होण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. पाकिस्तानच्या सदस्यत्वाला पाठिंबा द्यावा, यासाठी आम्ही सदस्य देशांशी संपर्क साधत आहोत. विशेषतः रशियन फेडरेशनकडे विनंती करत आहोत,’ असे जमाली यांनी स्पष्ट केले.
ब्रिक्स देशात जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणारा चीन, ब्राझिल, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत चार जवान शहीद!
येमेनमध्ये भारतीय मुलीला मृत्युदंडाची शिक्षा
मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!
नीरव मोदीची संपत्ती ताब्यात घ्यायला पंजाब नॅशनल बँकेला हिरवा कंदील
त्यानंतर सौदी अरेबिया, इराण, इथिओपिया, इजिप्त, अर्जेंटिना आणि युएई या देशांचा समावेश जानेवारी २०२४मध्ये केला जाईल. या देशांसह पाकिस्तानचा समावेशही ब्रिक्समध्ये होईल, यासाठी पाकिस्तान सरकार प्रयत्नशील आहे. रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्जी रियाबकोव्ह यांनीही इच्छुक देशांची नावे ब्रिक्समध्ये समाविष्ट करण्याबाबत सकारात्मता दर्शवली असल्याचे स्पष्ट केले आहे. पुढील ब्रिक्स परिषद सन २०२४मध्ये रशियातील कझान येथे होत आहे. पाकिस्तानला ब्रिक्सचे सदस्यत्व देण्यासाठी चीननेही सकारात्मक कौल दिला आहे.
भारत सरकारनेही ब्रिक्स गटात आणखी सदस्यांना सामावून घेण्यास संपूर्ण पाठिंबा दर्शवला असला तरी भारताने पाकिस्तानच्या सहभागावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.