डॉक्टर हे देवदूताप्रमाणे असतात, ही आपली पूर्वापारची समज. मात्र गेल्या काही वर्षांत या वैद्यकीय पेशानेही व्यावसायिक तत्त्व अंगिकारले. अशाही परिस्थितीत काही डॉक्टर आपले कर्तव्य इमान-इतबारे पार पाडत असतात. याचाच प्रत्यय सोमवारी आला. नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाचे कार्डिओथोरॅकिक सर्जन डॉ. संजीव जाधव यांनी अनेक अडथळ्यांना पार करत ब्रेनडेड व्यक्तीची फुप्फुसे चेन्नईच्या रुग्णालयातील मृत्यूशी झुंजणाऱ्या रुग्णापर्यंत नीट पोहोचवून यशस्वी प्रत्यारोपण केले. या दरम्यान त्यांच्या रुग्णवाहिकेला अपघात झाला, त्यांचे सहकारी जखमी झाले, तरीही त्यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले.
डॉ. संजीव जाधव आणि त्यांचे पथक ब्रेनडेड रुग्णाची फुप्फुसे रुग्णवाहिकेतून घेऊन जात होते. मात्र त्यांच्या रुग्णवाहिकेला पिंपरी चिंचवड येथे अपघात झाला. दोन गाड्यांना धडक देत ही रुग्णावाहिका हॅरिस उड्डाणपुलाच्या भिंतीवर जाऊन धडकली. डॉ. जाधव आणि अन्य डॉक्टरासह अन्य पथकांना दुसऱ्या वाहनातून नेण्यात आले. यातील अनेक अपघातात जखमी झाले होते. त्यानंतर तातडीने ते सर्व विमानतळावर पोहोचले आणि चार्टर विमानाने चेन्नईत दाखल झाले.
हे ही वाचा:
आयसीसीकडून बंदी; ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू मॅकगेहे यांची निवृत्ती!
अंतिम सामन्यातील पराभवाच्या कामगिरीत काही कर्णधारांचे सातत्य
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाला जिवंत करण्याचा दावा; मृतदेहाच्या बाजूला तासन् तास झोपला मांत्रिक!
या सर्जनने चेन्नईतील रुग्णालयात लाइफ सपोर्टवर असणाऱ्या रुग्णावर यशस्वी फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. ‘हा रुग्ण गेल्या ७२ दिवसांपासून जीवरक्षक प्रणालीवर होता. सोमवारी जर शस्त्रक्रिया पार पाडली नसती, तर कदाचित तो प्राणाला मुकला असता. आता या रुग्णाची प्रकृती चांगली आहे,’ असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
डॉ. जाधव यांनी सोमवारच्या अपघाताच्या प्रसंगाचे वर्णन केले. डॉ. जाधव स्वतः रुग्णवाहिकेच्या चालकाच्या बाजूला बसले होते. ‘या अपघातात चालकाच्या हातापायाला आणि डोक्याला जखम झाली. ‘आम्ही हे सारे विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. रुग्ण आधीच ऑपरेशन टेबलवर होता. आम्हाला या फुप्फुसाचा वापर करता यावा, यासाठी हातात केवळ सहा ते आठ तास होते. रुग्णवाहिका संध्याकाळी पाच वाजता विमानतळाच्या दिशेने निघाली. अपघातानंतर, अपघातग्रस्त चालकावर उपचार करण्यासाठी काही वैद्यकीय पथक तिथेच थांबले. चार्टर विमान चेन्नईत वेळेवर उतरले आणि ही फुप्फुसे अपोलो रुग्णालयात संध्याकाळी साडेआठला पोहोचली. फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता यशस्वीरीत्या पार पाडली, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.