शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा जबाब मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी नोंदविण्यात आला. तसेच शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू यांची उलट तपासणीदेखील घेतली आहे. विशेष म्हणजे विधानसभेत जबाब नोंदविण्यासाठी विटनेस बॉक्स लावण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर मंगळवार सकाळपासून सुनावणी पार पडत आहे.
विटनेस बॉक्स सभागृहात मांडला गेला आहे. सुनील प्रभूंना आत बसण्याची परवानगी दिली जाणार आहे. पुढच्या सुनावणीवेळी जे कोणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदवण्यासाठी समोर येतील, त्यांना त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहून स्टेटमेंट देण्याची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, वकिलांच्या शेजारी बसून सुनील प्रभू यांनी जे जबाब दिले ते रेकॉर्ड करुन घेण्यात आले. याशिवाय शिंदे गटाच्या वकिलांनी काही प्रश्न देखील विचारले. त्यावर सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं.
विधानसभेत या प्रकरणावर पहिल्या सत्राची सुनावणी पार पडली आहे. तर अडीच वाजेपासून दुसऱ्या सत्राची सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणीसाठी विधासभेच्या सभागृहात विटनेस बॉक्स बसविण्यात आला आहे. पहिल्या सत्रात सुनील प्रभू यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांनी त्यांची उलट तपासणी केली. सुनील प्रभू त्यांच्या वकिलांसोबत बसले होते. यावरही शिंदे गटाने आक्षेप घेतला. साक्षीदाराला त्याच्या वकिलांबरोबर बसण्याची परवानगी देऊ नये. त्याला स्वातंत्र बसण्याची सोय करण्यात यावी. यावर अध्यक्षांनी दुसऱ्या सत्रात सोय करण्यात येईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर विधान भवनात विटनेस बॉक्स तयार करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!
‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’
अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स
उलट तपासणीवेळी सुनील प्रभू यांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तुमची भाजपा-शिवसेनेची युती होती. त्यावेळी प्रचार करताना तुम्ही भाजपाच्या नेत्यांच्या नावाने मते मागितली का? किंवा काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली होती का? त्यावर सुनील प्रभूंनी उत्तर दिलं की, मी आमदार म्हणून जी विकासकामे केली होती त्याच आधारे मी मते मागितली होती, असं उत्तर सुनील प्रभूंनी दिलं.