जगभरात सध्या चर्चा आहे ती आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची. त्यानंतर चर्चा आहे ती भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची. या संपूर्ण स्पर्धेत भारत हा एकमेव संघ आहे जो आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. संघातील ११ खेळाडूंचा या यशात समान वाटा असला तरी योग्य वेळी जबरदस्त खेळी आणि अगदी अचूक निर्णय यामुळे रोहित शर्मा चांगलाच चर्चेत आला आहे. यशस्वी कर्णधार म्हणूनही आज रोहित शर्माकडे पाहिले जात आहे.
बॅकफूटवर जाऊन लेगला उत्तुंग षटकार मारण्याची हातोटी, समोर कोणत्याही संघाचा कोणीही गोलंदाज असो, बॉल कसाही येवो तो चेंडू सीमापार पोहचवण्याची क्षमता रोहित शर्माने आजपर्यंत अनेकदा सिद्ध करून दाखविली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज, उपकर्णधार आणि आता कर्णधार शिवाय एक यशस्वी खेळाडू असा नावलौकिक असणाऱ्या रोहित शर्माचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याच्या कारकिर्दीतील हे सर्व टप्पे खडतर होते पण आज अनेकांसाठी त्याचा हा प्रवास प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे.
नागपूरचा मुलगा झाला मुंबईकर
रोहित गुरुनाथ शर्मा, ३० एप्रिल १९८७ रोजी नागपूरमध्ये जन्म झाला. त्याचे वडील नोकरी करायचे तर आई गृहिणी होती. लहानपणीच तो त्याच्या काकांकडे, मुंबईतील बोरिवलीला राहायला आला. त्यामुळे नागपूरचा मुलगा कायमचा मुंबईकर झाला. रोहितला क्रिकेटची आवड आहे हे त्याच्या काकांनी हेरलं होतं. क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याला ट्रेनिंग द्यायचं, असं त्याच्या काकांनी ठरवलं, पण पैशांची अडचण होती. मग १९९९ साली त्याच्या काकांनी मित्रांकडून पैसे गोळा केले आणि एका क्रिकेट अकॅडमीमध्ये रोहितचं नाव नोंदवलं आणि सुरू झाला रोहितचा क्रिकेटचा प्रवास.
गोलंदाज बनला भारताचा सलामीवीर फलंदाज
मुंबईत क्रिकेट कोच म्हणून दिनेश लाड यांचे नाव प्रसिद्ध होते. त्यांनी मुंबईतील अनेक खेळाडू हेरले आणि घडवलेत. त्यांची नजर रोहितवर पडली आणि त्यांनी त्याच्यावर विशेष लक्ष दिलं. त्यांनी क्रिकेटसाठी रोहित शर्माची शाळा बदलली. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचं नाव नोंदवलं. पण अडचण होती ती पैशाची. दिनेश लाड यांनी तीही सोडवली. त्यांनी रोहितला एक स्कॉलरशिप मिळवून दिली आणि पुढच्या चार वर्षांच्या पैशाचा प्रश्न सुटला. या संधीचा फायदा रोहित शर्माने घेतला आणि झोकून देऊन प्रॅक्टिस केली. रोहित हा गोलंदाज होता. तो ऑफ स्पिन बोलिंग करायचा आणि बॅटिंगसाठी आठव्या क्रमांकावर यायचा. पुढे त्याच्यात फलंदाजीचीही क्षमता असल्याचे लक्षात येताच दिनेश लाड यांनी त्याला फलंदाजीवरही लक्ष देण्यास सांगितले.
२००५ मध्ये केले होते पदार्पण
२००५ साली रोहित शर्माने देवधर ट्रॉफीमधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. पुढे २००६ मध्ये १९ वर्षाखालील क्रिकेट संघामध्ये रोहितचा समावेश झाला. त्यानंतर लगेच त्याने इंडिया ए टीमकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याच वर्षी रोहित शर्माने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. मुंबईकडून खेळत असलेल्या रोहितच्या टीमने त्यावर्षीची रणजी ट्रॉफी जिंकली.
धोनीचा विश्वास सार्थकी लावला
पुढे काही काळ रोहितची कामगिरी थंडावली होती. त्याच्या खराब कामगिरीमुळे २०११ च्या वर्ल्ड कपच्या भारतीय संघात त्याला स्थान मिळालं नाही. रोहित शर्माचे करिअर संपले असं तेव्हा म्हटलं जात होतं. पण, रोहितने भरारी घेतली. तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि रोहितला थेट ओपनिंग करायला सांगितलं. धोनीने संधी दिली आणि ओपनिंग करायला आलेल्या रोहितने त्यानंतर मात्र कधीही मागे पाहिलं नाही. त्याने सुरुवातील शिखर धवनच्या साथीने स्फोटक ओपनिंग करायला सुरूवात केली आणि त्याचा धसका जगभरातल्या सर्वच संघांनी घेतला. रोहित शर्मा मैदानात आला की बॉलर कुणीही असो, बॉल सीमापार जाणारच हा विश्वास आहे.
हे ही वाचा:
निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान
‘खर्गे यांनी माझ्या मृत वडिलांबद्दल अपशब्द वापरले’
मणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा
चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता
तीन डबल सेंच्युरी मारणारा एकमेव
पुढे तीन वर्ल्ड कप गाजवले, वन डेमध्ये तीन डबल सेंचुरी मारल्या. आतापर्यत त्याने वनडेमध्ये तीन डबल सेंच्युरी मारल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात २०९, त्यानंतर श्रीलंकेविरोधात २६४ आणि २०८ धावा त्याने केल्या आहेत. तीन डबल सेंच्युरी मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. याशिवायही आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहित शर्माला २०२० साली खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याच्यासोबत त्याचे गुरू दिनेश लाड यांनाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
करिअर संपलं अशी अनेकदा त्याच्यावर टीका झाली, त्या टीकाकारांना त्याने नेहमी त्याच्या बॅटमधून उत्तर दिलं आहे. आज रोहित शर्मा त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोच्च पॉईंटवर आहे. इथेही तो बाजी मारेलचं आज हा विश्वास १४० कोटी जनतेला आहे.