विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भेदक गोलंदाजी करून न्यूझीलंडचे सात विकेट टिपणारा भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामी याच्या उत्तर प्रदेशातील छोट्या गावात आता मिनी स्टेडिअम आणि व्यायामशाळा उभारली जाणार आहे. अमरोहा जिल्हा प्रशासन हा प्रस्ताव सादर करण्याच्या तयारीत आहे.
उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील साहसपूर अलिनगर हे मोहम्मद शामीचे मूळ गाव. मोहम्मद शामीने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने अंतिम भेरीत धडक मारली आहे. त्यामुळे शामीवर सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्हा प्रशासनही शामी याच्या मूळ गावात मिनी स्टेडियम आणि व्यायामशाळा उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याच्या तयारीत आहे.
‘मोहम्मद शामीच्या गावात मिनी स्टेडिअम बांधण्याचा प्रस्ताव आम्ही पाठवणार आहोत. तसेच, येथे खुली व्यायामशाळाही उभारली जाईल. त्या गावात पुरेशी जमीन आहे,’ अशी माहिती अमरोहचे जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी यांनी दिली. ‘उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यभरात २० स्टेडियम उभारण्याचे निर्देश दिले आहेत. अमरोहा जिल्ह्याचे स्टेडियम हे त्यापैकीच एक असेल,’ असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
चॅट जीपीटीची पालक कंपनी ओपन एआयच्या सीईओला दाखविला बाहेरचा रस्ता
भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे
मोहम्मद शमीच्या ट्रोलिंगमागे पाकिस्तानचा कट
जागतिक दक्षिण देशांमध्ये चीनचा प्रभाव कमी; भारताचा दबदबा वाढला
त्यागी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शामीच्या गावी जाऊन मिनी स्टेडिअम आणि व्यायामशाळेसाठी योग्य जागेची चाचपणी केली. त्यामुळे त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आता प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला लागली आहे. या संदर्भातील अहवाल राज्य सरकारला पाठवल्यानंतर सरकार तो मंजूर करेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.