मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू केल्यानंतर वेळोवेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे पाटलांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला, पाठिंबा दिला, त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. तेच राज ठाकरे आता ‘जरांगेच्या पाठीशी कोण आहे हे कालांतराने उघड होईलच’, असे सूचक वक्तव्य करीत आहेत. राजकारणात अशी उघड भूमिका घेणे परवडणारे नसते, कारण निवडणुकांचे गणित अशा विधानांमुळे बिघडू शकते. राज ठाकरे यांनी ते धाडस दाखवले आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला प्रश्न अनेकांच्या मनातला आहे.
पहिल्या उपोषणा दरम्यान अंतरावली सराटी येथे राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. ‘या प्रश्नावर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू’ असे आश्वासन दिले होते. दुसऱ्यांदा जेव्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हा राज ठाकरे यांनी त्यांना सविस्तर पत्र लिहिले. या पत्राचा आशय अत्यंत महत्वाचा आहे. ‘मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तरुण आत्महत्या करीत आहेत. अशी निराशा पसरणे वाईट आहे. याचा शेवट समाजा समाजात विद्वेष परसण्यात व्हायला नको. अठरापगड जातींची मोट बांधून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मंत्र दिला. ही शिकवण विसरता कामा नये. महाराष्ट्राने देशाला प्रबोधनाचा मंत्र दिला. तो महाराष्ट्र जातीपातीच्या विद्वेषात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश-बिहार व्हायला वेळ लागणार नाही’, अशी परखड भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. विकास ज्यांच्या पर्यंत पोहोचला नाही, त्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी ठाम भूमिका त्यांना मांडली होती.
अंतरावली सराटी येथेही राज ठाकरे यांनी हीच भूमिका मांडली होती. अशा प्रकारे आंदोलन करून आरक्षण मिळणार नाही, असे जरांगेना तोंडावर सुनावले होते. आरक्षणाचा तिढा सर्वोच्च न्यायालयातच सुटू शकतो, हा प्रश्न उपोषण आणि रस्त्यावरच्या आंदोलनाच्या माध्यमातून सुटणारा नाही, याचे राज ठाकरेंना भान आहे. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी हीच भूमिका अधिक परखडपणे मांडली आहे. ‘जातीभेद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सुरू आहे. जरांगेंच्या पाठीशी कोण आहे, हे कालांतराने उघड होईलच’, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
जरांगेंच्या आंदोलनाला मराठा समाजातून पाठिंबा आहे. परंतु हा पाठिंबा आरक्षणाच्या मुद्द्यावर आहे. जाळपोळ, तरुणांच्या आत्महत्या, जनतेला उपद्रव निर्माण होईल अशा आंदोलनाला हा पाठिंबा नाही. २४ डिसेंबरनंतर मुंबईत धडक देण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. त्यांच्या विधानात अनेकदा राजकारणाचा वास येतो. त्यांच्या पाठीशी कुणी तरी आहे, ही शंकाही याच विधानामुळे येते. काड्या करणारा उपमुख्यमंत्री या शब्दात ते कधी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात, तर कधी भुजबळांना. जरांगेंच्या जळजळीत विधानांमुळे ओबीसी समाजाचे नेते अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात ओबीसी-विरुद्ध मराठा असे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. जरांगेचे समर्थक निवडणुकीत छगन भुजबळ यांना पाडण्याची भाषा करीत आहेत. जर भुजबळांना पाडले तर १६० जागांवर मराठा नेत्यांना पाडू, असे प्रति आव्हान भुजबळांचे समर्थक नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलेले आहे.
पद्धतशीरपणे वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र गंधकाच्या ढिगाऱ्यावर बसला आहे, फक्त एक ठिणगी पडली तर स्फोट होऊ शकतो. ही ठिणगी पडावी म्हणून काहीजण पाण्यात देव घालून बसले आहेत. पेटवापेटवी करणारी विधाने दोन्ही कडून केली जातायत. समाजात तेढ निर्माण केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या सडेतोड भूमिकेचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. स्वराज्य निर्मिती ही कुठल्या एका जातीने केलेली नाही. अठरापगड जाती एकत्र करून छत्रपतींनी इस्लामी सत्तेच्या विरुद्ध संघर्ष केला. सर्व जाती-पातीच्या लोकांना स्वराज्य उभारणीसाठी हाती शस्त्र धारण केले. रक्त सांडले, वेळ प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. सगळ्या जातीचे लोक महाराष्ट्रात मराठे म्हणून उभे राहिले. पेशव्यांच्या हाती सत्तेची सूत्र गेल्यानंतरही उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत या साम्राज्याची ओळख मराठा साम्राज्य अशीच होती.
हे ही वाचा:
‘चीनने कोणत्याही देशाची एक इंच जमीनही बळकावलेली नाही’
ग्रेट!! पाच वर्षांत रेल्वेच्या प्रतीक्षा यादीचा त्रास संपणार
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उबाठाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं अतिशय निंदनीय
मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले असे विधान जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांना बहुधा मराठे म्हणजे नेमके काय? याचा अर्थच कळलेला नाही. मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले. हा अटक किल्ला आज पाकिस्तानात आहे. अटकेचा विजय मराठा इतिहासातील सुवर्णक्षण. मराठ्यांचे घोडे सिंधू नदीचे पाणी प्यायले म्हणून पुण्यात कित्येक दिवस उत्सव साजरा झाला. त्या मोहीमेचे नेतृत्व रघुनाथराव पेशव्यांनी केले होते.
जातीपातीच्या नावावर महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतोय, जरांगेच्या पाठीमागे कोण आहे, हे उघड होईल असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर जरांगे गप्प बसतील अशी शक्यता नव्हतीच. कोण आहे, त्याचा तुम्ही शोध घ्या आणि आम्हालाही सांगा. आमच्या पाठीशी फक्त मराठा समाजाची ताकद आहे, असे जरांगेनी प्रत्युत्तर दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर काही नेते खोटे पसरवायला लागतात, पुड्या सोडायला लागतात, अशी टीकाही केली.
जरांगे जिथे जिथे जातात, तिथे त्यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण होते. त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा असतो. लोकवर्गणीतून केलेल्या आंदोलनात हा भपका पूर्वी कधी पाहायला मिळाला नव्हता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौऱ्यावर असतानाही हे चित्र दिसत नाही. जरांगेंच्या पाठीशी कोणी आहे, असा भास लोकांना उगीचच होत नाही. जरांगेंच्या पाठीशी कोणी तरी आहे, असे सूचवणारे राज ठाकरेंचे वक्तव्य आल्यानंतर मी कुठेच नसलो तरी सगळीकडे असतो, हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही विधान आलेले आहे. राज ठाकरे यांच्या विधानामुळे संशयाची सुई अनेकांकडे वळली आहे. काही लोकांच्या मनात थोरल्या पवारांचे नाव आले आहे, महाराष्ट्रातील एक तालेवार नेताही या मागे असल्याची चर्चा आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)