शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवार, १७ नोव्हेंबर रोजी ११ वा स्मृतीदिन आहे. स्मृतीदिनानिमित्त राज्यभरातून, देशभरातून हजारो शिवसैनिक स्मृतीस्थळावर म्हणजेच दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यानिमित्ताने १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मात्र, ठाकरे गटाचे कार्यकर्तेही तिथे जमल्यामुळे शिवतीर्थावर तणाव निर्माण झाला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी पार्क येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. कारण बाळासाहेबांचा स्मृतीदिन शांततेत साजरा होतो. महाराष्ट्रातून कार्यकर्ते येतात, नतमस्तक होतात आणि आपआपल्या गावी निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष नको, स्मृतीदिनाला गालबोट लागू नये म्हणून मी, आमदार, खासदार शांतपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालो. दर्शन घेतलं आणि आम्ही निघून गेलो. पण, इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी निघत असताना उबाठाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडा करणं, घोषणाबाजी करणं, महिलांना धक्काबुक्की करणं ही बाब अतिशय निंदनीय आहे.”
हे ही वाचा:
वसईकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यात मेहत्तर समाजाची भूमिका महत्त्वाची!
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या दोन गटाच्या कार्यकर्त्यांत धूमश्चक्री
मातोश्री-२मध्ये शिवभोजन थाळीचा हातभार किती?
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी
शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला होता. काही वेळ वादावादी आणि धक्काबुक्की सुरू होती. घोषणाबाजी करत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर नेले.