देशात रेल्वेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा रोजगार प्रदान करणारा सहारा इंडीया परिवार, त्यांचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय कधी काळी सतत प्रसिद्धीच्या झोतात होते. गेली काही वर्षे मात्र त्यांच्याबद्दल चर्चा ओसरली आहे. झालीच तर फक्त नकारात्मक कारणांसाठी होते. सहारा चिटफंड घोटाळाप्रकरणी २०१४ मध्ये सुब्रतो रॉय यांना कारावास झाला. २०१७ मध्ये प्रकृतीच्या कारणांसाठी त्यांची पेरॉलवर सुटका झाली. सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या सुब्रतो रॉय यांचा प्रवास थक्क करणारा आहे. देशातील कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटी, खेळाडू आणि नेत्यांना पोसणारा हा नेता. रॉय यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने अनेकांची दुकाने बंद झाली, अनेक नेते पोरके झाले.
रॉय यांच्याबद्दल चर्चा बंद होऊन आता बराच काळ लोटला. अलिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सहाराश्री यांचे नाव घेऊन उद्धव ठाकरेंवर बॉम्ब टाकला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेले सेटॉर हॉटेल सहारा परिवाराने विकत घेतले. आज हे हॉटेल सहारा स्टार या नावाने ओळखले जाते. हॉटेलचा ताबा घेतल्यानंतर सर्व मराठी कामगारांची त्यांनी हकालपट्टी केली. इथे भारतीय कामगार सेनेची युनियन होती. कामगारांना कमी केल्यानंतर तोंड आवळून बसण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ७ कोटी रुपये घेतले होते, असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. उद्धव ठाकरेंनी या आरोपाला उत्तर दिलेले नाही. राणे जे काही म्हणाले ते खरे वाटावे असा सहाराश्रींचा इतिहास आहे. देशातील सर्व राजकारण्यांचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होते. मातोश्रीवर त्यांची उठबस होती. प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासाठी रेड कार्पेट पसरले जाई. कारण सहाराश्री येणार म्हणजे लक्ष्मी येणार असा सरळ हिशोब होता.
लखनौच्या अतिश्रीमंत परिसरात ११० एकरवर त्यांची सहारा सिटी पसरलेली आहे. इथेच त्यांचे वास्तव्य असते. २००४ मध्ये इथेच त्यांच्या सुशांतो आणि सिमांतो या दोन मुलांचे विवाह सोहळे पार पडले. तेव्हा इथे राजकीय नेत्यांची जंत्री लागली होती. २०१७ मध्ये पेरॉलवरून सुटल्यानंतर त्यांच्या मातोश्रींच्या श्राद्धालाही मोठ्या संख्येने राजकीय नेते आणि अन्य क्षेत्रातील मान्यवर आले होते. एकाही राजकीय पक्षाचा अपवाद नव्हता. हा माणूस चार दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून आलेला आहे, हे जर कोणा नवख्याला सांगितले असते तर कोणाचा विश्वास बसला नसता.
लोणावळ्यात एम्बिव्हॅली नावाचा जो प्रकल्प साकारला आहे, त्यासाठी त्यांनी ८० च्या दशकात जमीन खरेदीला सुरूवात केली. हळुहळु सुमारे दहा हजार एकर जमीन विकत घेतली. इथे बडे कॉर्पोरेट, कलाकार, खेळाडूंसाठी भव्य गृहनिर्माण प्रकल्प साकारण्याची त्यांचे स्वप्न होते. २००६ पासून ते प्रत्यक्षात आले. आज इथे दुबईच्या राजघराण्यातील लोक मुक्कामाला येतात. १९८० मध्ये २५ रुपये चौ.फू.नी घेतलेली जागा त्यांनी ५० हजार चौ.फू.नी विकली. याला म्हणतात दूरदृष्टी.
वसईतही त्यांच्याकडे मोठी लँड बँक होती. त्या काळात या जमीनीकडे कोणाचे लक्ष होते? या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनी त्यांना मदत केली. उद्योगपती प्रशांत कारुळकर यांनी वसईतील त्यांच्या लँड बँकमधील २०० एकर जमीन खरेदी केली होती. असा पहिलावहिला सौदा करणाऱ्या कारुळकरांना सुब्रतो राय यांनी दिलदारपणे हात दिला होता.
एखाद्या नवख्या ठिकाणी मोठा प्रकल्प सुरू झाला की लगेचच तिथे स्थानिक भुरटे नेते पोहोचतात. त्यांचे भले केल्याशिवाय तो प्रकल्प पुढे नेता येत नाही. परंतु, सहाराश्री यांच्या प्रकल्पाला आडवे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. कोणत्याही पक्षाचा नेता समोर आला की त्याला त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचा फोन येई. अर्थात बड्या नेत्यांच्या ओळखी असल्यामुळे सहाराश्री कोणाला दुखावत नसत. ते प्रत्येकाची काळजी घेत. प्रत्येकाला त्याच्या योग्यते प्रमाणे दरमहा किंवा सणावाराला ठरलेले पाकिट किंवा सुटकेस जात असे.
सहाराश्री यांच्या गळाला लागलेला पहीला मोठा मासा म्हणजे उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव. हे संबंध निर्माण झाले अमर सिंह यांच्या मुळे. अमर सिंह यांच्यामुळे सहाराश्रींचा संबंध बॉलिवुडशी आला. वाईट काळात बीग बी अमिताभ बच्चन यांनाही सहाराश्री यांचा आधार मिळाला. आता ज्याच्याकडे बॉलिवूडचा एक्का आहे, त्याच्याकडे बाकी कलाकारांची रांग लागली तर त्याच नवल ते काय? अनेक कलाकारांच्या अडीनडीला ते उभे राहत असत. बॉलिवूडचा एक प्रख्यात गायक ज्याचा ठाकरे परिवाराशी पंगा होता, तो आर्थिक अडचणीत असताना योगायोगाने सहाराश्रींना लखनौ विमानतळावर भेटला. त्याची नड कळण्यावर सहाराश्रींनी त्याच्या बोर्डींग पासवर तीन रुपये असे लिहून त्याला तो कपटा दिला. मुंबईत त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटायला सांगितले. तो कागदाचा कपटा दिल्यावर त्याला ३ कोटी रुपये देण्यात आले.
अनेक अभिनेत्रींशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते. त्यातली एकतर बॉलिवूडची सम्राज्ञी होती. अलिकडेच तिचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडच्या तारे तारकांची रेलचेल होती. ते कायम चार्टर्ड विमानाने फिरायचे. त्यांच्यासोबत आणखी दोन विमानांचा ताफा उडायचा. सहाश्रीं यांनी ज्या नेत्यांना, कलाकारांना कोट्यवधींची मदत केली. परंतु, शितं होती तोपर्यंत भूतं होती. त्यांच्या आजूबाजूला जो गोतावळा होता, त्यापैकी एकाही व्यक्तिने २०१४ मध्ये त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना फोनही केला नाही. २०१७ मध्ये पेरॉलवर त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची चर्चा थांबली होती. फक्त न्यायालयातील प्रकरणाबाबत ऐकायला मिळत असे.
बिहारच्या आररीयामध्ये जन्माला आलेले रॉय, रुजले मात्र उत्तर प्रदेशात. मेकॅनिकल इंजिनिअरींग पर्यंतचे त्यांचे शिक्षण इथेच झाले. डबघाईला आलेली सहारा फायनान्स ही कंपनी त्यांनी १९७६ मध्ये ताब्यात घेतली. याच कंपनीचे नामकरण सहारा इंडीया परिवार असे करण्यात आले. या कंपनीने पुढच्या दोन दशकांत घेतलेली झेप थक्क करणारी आहे. चिट फंड कंपनीपासून हा प्रवास सुरू झाला. मीडिया, बांधकाम, विमानोड्डाण, सिनेनिर्मीती अशा अनेक क्षेत्रात सहाराने पाय रोवले.
रिझर्व्ह बँकेच्या परवानगी शिवाय लोकांकडून पैसे गोळा केल्याप्रकरणी त्यांच्या मागे कायद्याच्या ससेमिरा सुरू झाला.
हे ही वाचा:
ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात
ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!
पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
देशातील कोट्यवधी गुंतवणूदारांचे २४ हजार कोटी रुपये परत करण्याचा आदेश त्यांना न्यायालयाने दिला. हे शक्य न झाल्यामुळे त्यांची रवानगी २०१४ मध्ये तुरुंगात झाली. तीन वर्षे ते दिल्लीतील तिहार तुरुंगात होते. ज्या नेत्यांनी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा निधी घेतला होता, त्यापैकी एकाने त्यांची मदत तर सोडा त्यांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही.
कधी काळी लॅम्ब्रेडा स्कूटरवरून गोरखपूरात नमकीन विकणाऱ्या सहाराश्री यांनी शून्यातून शिखर गाठले. त्या शिखरावरून पुन्हा एकदा त्यांची जबरदस्त घसरण झाली. हा माणूस बरा होता वाईट होता, यावर चर्चा होत राहील. परंतु, त्यांची भारतभक्ती वादातीत होती.
सहाराच्या प्रत्येक कार्यालयाबाहेर भारतमातेची प्रतिमा स्थापन केलेली आपल्याला पाहता येईल. सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाला त्यांनी उघड विरोध केला होता. हीच भूमिका आपल्या पडझडीला कारणीभूत ठरली अशी त्यांनी भावना होती. ते वादग्रस्त होते, परंतु भारताचा उद्योग जगताचा इतिहास सांगताना त्यांचे नाव टाळता येणार नाही. देशातील उद्योग पर्वातील एका महत्वाच्या अध्यायाची अखेर झाली आहे.