शिउबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांचे पार्टटाईम नेते आहेत. त्यांची खरी भक्ती आणि श्रद्धा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरच आहे. राऊत मातोश्रीवर कमी आणि सिल्वर ओकवर जास्त दिसतात. इतकी भक्ती असूनही संजय राऊतांना शरद पवार अनेकदा तोंडावर पाडत असतात. पुन्हा एकदा पवारांनी तसेच केले आहे.
अनेक लोक देवपूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाहीत, राऊत त्यांच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना चॅनलवरून मुखदर्शन दिल्याशिवाय अन्नग्रहण करत नाहीत. त्यामुळे रोज सकाळी चॅनलचे बूम पाहिल्याशिवाय राऊतांचा दिवस सुरू होत नाही. काही दिवसांपूर्वी बूमच्या गर्दीसमोर नेहमीच्या फॉर्मात राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. एकेकाळी कोणी कोणाबद्दल बोलावं, याच्या काही फूटपट्ट्या होत्या. संजय राऊतांनी त्या साफ मोडून काढल्या. ते पुतीनपासून अभिजीत बिचकुलेपर्यंत सर्वांवर मत प्रदर्शन करत असतात. चॅनलवाल्यांनीही त्यांचा हा अधिकार मान्य केला आहे. ‘देशाच्या पंतप्रधानांना जात नसते. निवडणुकीत पराभव दिसू लागला की ते जातीची ढाल पुढे करतात’, असे टीकास्त्र राऊतांनी सोडले होते.
राऊतांचे नवे मालक राहुल गांधी जातीसह आपलं गोत्र सांगतात तेव्हा राऊत गप्प असतात. आता तर त्यांचे गुरू शरद पवार यांनी स्वत:च्या जातीबाबत विधान केलेले आहे. ‘माझी जात काय आहे ती सर्वांना ठाऊक आहे. जन्माने जी जात येते ती लपवता येत नाही’, हे पवारांचे ताजे विधान आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यापासून मराठा समाजातील अनेक नेते पवारांच्या विरोधात तोफ डागताना दिसत आहेत. प्राध्यापक नामदेव जाधव यांचा एक व्हीडिओ अलिकडे प्रचंड व्हायरल झाला. पवार हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप जाधवांनी केला आला आहे. पवार हे मराठा नसून ओबीसी असल्याचा त्यांचा दावा आहे. या गौप्यस्फोटानंतर पवार हे मराठा नसून हिंदू ओबीसी असल्याची काही कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली.
या पार्श्वभूमीवर अगदीच अगतिक झालेल्या पवारांनी जातीबाबत खुलासा केला. परंतु खुलासा करतानाही जात सांगितली नाही. आपली जात सर्वांना माहीत आहे, जात लपवता येत नाही, असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
महुआ मोईत्रा यांना पक्षाची नवी जबाबदारी!
टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!
जिहादींचा नंगानाच; कानिफनाथ मंदिरातील पुजारी, भक्तांना लाथाबुक्क्यांनी मारले
अवकाशातील प्रकाशउत्सव… नासाकडून दिवाळी शुभेच्छा!
शरद पवारांनी खुलासा करण्याची गरज नव्हती. राजकारणात विरोध आरोपांचे किटाळ उडवतच असतात. जातीबाबत खुलासा करताना त्यांच्यावर जो मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप झाला त्यावर त्यांनी बोलणे अपेक्षित होते. परंतु आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या तब्बल चार टर्ममध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर आपण मौन का राहिलो? मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या शालिनी पाटील यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न का केला?
आऱक्षणाच्या मुद्यावर तरुण पिढीच्या भावना तीव्र आहेत, या विधानासह आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी काही नवे दावे केले आहेत. ही विधाने अनेक प्रश्न निर्माण करणारी आहेत. तरुणांच्या आरक्षणाबाबतच्या तीव्र भावनांचा साक्षात्कार वयाची आठ दशकं उलटल्यावर त्यांना का झाला? हा विषय केंद्र आणि राज्य सरकार दोघांच्या अखत्यारीत येतो हे त्यांना देशात २००४ ते २०१४ यूपीएची आणि महाराष्ट्रात १९९९ ते २०१४ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना माहीत नव्हते का?
पवारांनी आपल्या जातीबाबत खुलासे करताना या मुद्द्यावर बोलणे अपेक्षित होते. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देत अनावश्यक मुद्द्यांवर बोलणे हा पवारांचा हातखंडा आहे. हा लौकीक त्यांनी यावेळीही जपला. स्वत:च्या जातीवर निर्माण केलेले प्रश्नचिन्ह दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मराठा समाजात पवारांच्या विरुद्ध मोठा आक्रोश आहे. प्राध्यापक नामदेव जाधव हे एकमेव नाहीत, सदानंद मोरे यांनीही यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत ज्या भावना व्यक्त केल्या त्याचे शब्द वेगळे असले तरी भावार्थ मात्र हाच होता.
मराठा स्ट्रॉन्ग मॅन ही प्रतिमा धुळीत मिळवणारे आरोप आता पवारांवर होतायत. त्याचे उत्तर देताना पवारांची परिस्थिती केविलवाणी झालेली दिसते. पवारांचे चेले संजय राऊत यांनी ज्या जातीच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य करण्याचा प्रय़त्न केला. मोदी जातीची ढाल करतात असा जो आरोप केला तो खरे तर शरद पवारांना चपखल लागू होतो. पवारांनी महाराष्ट्रात जातीचे विष कालवले असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. पवारांच्या राजकारणाचे इतके यथार्थ वर्णन यापूर्वी कोणत्याही राजकीय नेत्याने केले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जाती जाती मध्ये भिंती उभ्या करण्याचे काम सुरू झाले. ब्राह्मण विरुद्ध मराठा असा संघर्ष टिपेला पोहोचला. आता राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या त्याच आगीचे चटके पवारांना बसू लागले आहेत.
राऊतांचे विधान प्रमाण मानले तर पवारांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे ते जातीची ढाल पुढे करतायत. शरद पवारांना निवडणुकीत पराभव दिसू लागलाय की राजकारणाचा पूर्णविराम हे संजय राऊतच स्पष्ट करू शकतील. परंतु राऊत जातीच्या मुद्द्यावर शरद पवारांची कानउघाडणी करू शकणार नाही. त्यामुळे पवारांमुळे ते पुन्हा एकदा तोंडावर पडणार हे निश्चित.
२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जातीच्या सापळ्यात अडकवण्यासाठी पवारांनी त्यांचे राजकारण पणाला लावले. आज जातीच्या त्याच सापळ्यात पवार अडकले आहेत. इथून बाहेर पडण्याचा ताकदीने प्रयत्न करतायत. परंतु प्रत्येक प्रयत्न त्यांना अधिक गाळात नेतोय असे चित्र आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)